मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदाबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्याचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली असून, उपमुख्यमंत्री पदासह खातेवाटपाबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
“आमचे नेते अजित ‘दादा’ पवार यांच्या परवाच्या निधनाने पक्षासह संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे. त्यांच्या कुटुंबाशी सल्लामसलत करून, महायुतीचा भाग म्हणून ही प्रक्रिया लवकर पूर्ण करायची आहे,” असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री ठरण्याची शक्यता
दरम्यान, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूचक वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. शपथविधीची तारीखही ठरल्याची चर्चा असून, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.
जर सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील, ही बाब राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक मानली जात आहे.
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, मुख्यमंत्री कार्यालयाकडून होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












Discussion about this post