मनपा सत्तासंघर्षाला गुन्हेगारी वळण; वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांचा वर्ध्याजवळ अपहरणाचा प्रयत्न
१० गुंड फरार, १ पोलिसांच्या ताब्यात; पहाटे अर्धा तास थरार Chandrapur Corporator Kidnapping
चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष आता थेट गुन्हेगारी पातळीवर पोहोचल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार समर्थक गटातील नगरसेवकांच्या वाहनावर वर्धा जिल्ह्यातील नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास हल्ला करून अपहरणाचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर मनपाचे काही नगरसेवक वाहनाने प्रवास करत असताना काही संशयितांनी त्यांच्या वाहनाला महामार्गावर अडवले. वाहनाभोवती घेराव घालून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. काही वेळ वाहन रोखून धरल्याने घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. जवळपास अर्धा तास हा थरार सुरू होता.
या प्रकरणी नगरसेवकांसोबत असलेले राजेश अड्डूर यांनी वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार सौरभ ठोंबरे याच्यासह नागपूर–चंद्रपूर परिसरातील सुमारे दहा जणांनी संगनमताने हल्ला करून अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यातील एक संशयित पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित दहा आरोपी फरार आहेत.
घटनेची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे सखोल तपास सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, हे गुंड नेमके कोण? कुणाच्या इशाऱ्यावर हा अपहरणाचा कट रचण्यात आला? अशा प्रश्नांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनपातील सत्तासमीकरणे, महापौर पदाची समीकरणे आणि काँग्रेस गटाची पुढील दिशा यावर या घटनेचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले असून, पोलिस तपासानंतरच संपूर्ण कटाचा पर्दाफाश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Chandrapur Corporator Kidnapping
Chandrapur मध्ये Congress च्या नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न
















Discussion about this post