माणिकगड फॅक्टरीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण-*
_शिक्षक कॉलोनीतील महिलांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी- गडचांदूर शहराला लागून असलेली माणिकगड सिमेंट कंपनी ग्रामवासीयांच्या जीवाशी खेळत असून ही कंपनी ‘प्रदूषण नियंत्रण सयंत्राचा’ वापर न करता नियमांचे सर्रास उलंघण करून रात्री बेसुमार डस्ट सोडत आहे. यासह कंपनीच्या डंपिंग यार्डमधील सडलेल्या कचऱ्याची अतिउग्र दुर्गंधी व विषारी वायुमुळे जवळपास ५ किमी परिसरातील रहिवासी हैराण असून सततचा डस्ट व दुर्गंधी यामुळे होणाऱ्या आजाराने परिसरातील रहिवासी दवाखान्याचा खर्च करून वैतागले आहेत. यातून आमची सुटका करून कंपनीवर दंडात्मक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन शिक्षक कॉलोनीतील महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
कंपनी मध्यरात्रीच्या दरम्यान डस्ट सोडत असून सकाळी उठल्यानंतर पोर्चमध्ये, अंगणात व घराच्या आतमध्ये धुळीचा थर साचलेला असतो. झाडांच्या पानावर साचलेल्या डस्टमुळे झाडेसुद्धा निस्तेज झालेली आहेत. यावर्षी कंपनी इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर घनकचऱ्याचा वापर करत आहे. कंपनीने या कचऱ्याची साठवणूक शहरालगतच डंपिंग यार्डमध्ये केली आहे. कंपनीच्या डस्टचे हवेतील प्रदूषण व डंपिंग यार्डमध्ये साठवलेल्या शेकडो टन सडलेल्या कचऱ्याचा उग्रवास यामुळे मळमळ होणे, उलटी, तीव्र डोकेदुखी, सर्दी-खोकला व दम्यासह इतर श्वसणाच्या आजारामुळे रहिवासी दवाखाना करून त्रासले असून गर्भवती महिला, वृद्ध व लहान बालकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होत आहे. या त्रासामुळे जवळपास ५ किमी परिसरातील रहिवासीयांचे जीवनमान धोक्यात असून कंपनीचा डस्ट व उग्र वास हा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.
कंपनीच्या परिसरातील नागरिकांना होणारा त्रास, आरोग्यहानी व पर्यावरणाचे नुकसान टाळण्याचे दृष्टीने कंपनीने रात्री डस्ट सोडणे बंद करून प्रदूषण नियंत्रण सयंत्राचा पुर्णपणे वापर करावा व डंपिंग यार्डमधील कचऱ्याच्या उग्र दुर्गंधीपासून सुटका व्हावी यासाठी कंपनीने कचऱ्याच्या डंपिंग यार्डची व्यवस्था शहरापासून किमान २० किमी दूर अंतरावर करावी. अश्या मागणीचे निवेदन शिक्षक कॉलोनी गडचांदूर येथील महिलांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना प्रत्यक्ष भेटून दिले. याप्रसंगी संगीता नगराळे, रेखा पाटील, रेखा शिंदेकर, इंदिरा पाचभाई, माधुरी रासेकर, विजयालक्ष्मी डोहे व शिक्षक कॉलोनीतील इतर महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.












Discussion about this post