अन्य शाळेतील केंद्र संचालक,पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार
मात्र केंद्रावर राहणार आता बैठे पथक.
लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटनांनी केला होता विरोध.


संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.२९. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यासाठी मंडळाने १० आणि १२ वीच्या शालांत परीक्षांमध्ये
सर्व परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक,पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा
निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि.१७ जानेवारी रोजीच्या पत्रकाप्रमाणे जाहीर केला होता.
मात्र बोर्डाच्या या निर्णयावर राज्यातील लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना व संस्थाचालक संघटना यांनी हरकती घेतलेल्या आहेत.शिक्षक भारतीसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या शिक्षक संघटनांनी या निर्णयाला खूपच विरोध केला होता.शिक्षकांनी सुद्धा आमच्यावर शासन व शिक्षण मंडळ अविश्वास दाखवत आहे.अशी भावना शिक्षकांची झाली होती.त्यामुळे या निर्णयात मंडळाने बदल केला असून, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी कोरोना काळातील सन २०२१ व सन २०२२ या दोन परीक्षा वगळून मागील ५ वर्षाच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च २०१८. २०१९, २०२०, २०२३ व २०२४ या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून आलेली आहेत. अशाच परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती सदर केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचान्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचान्यांमधून करण्यात येणार आहे.असा बदल दि. २९ जानेवारी रोजी जारी केलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या पत्रकात म्हटले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या इ. १० वी व इ. १२ वी परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.अशी सूचना वजा तंबी शिक्षण मंडळांने सदर पत्रकात दिली आहे.
त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्हयात इ. १० वी व इ. १२ वीची परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकते प्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे.
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), सदस्य सचिव दक्षता समिती, विभागीय मंडळे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दवता समिती अध्यक्ष यांच्या सहकायनि परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक कार्यरत राहील.अशी कार्यवाही करणेबाबत राज्य शिक्षण मंडळाने या पत्रकाद्वारे सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आलेले आहे.
सचिव राज्य मंडळ,पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिनांक २९ जानेवारी रोज बुधवारला हे परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा दि. ११/०२/२०२५ ते दि. १८/०३/२०२५ व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा दि. २१/०२/२०२५ ते दि. १७/०३/२०२५ या कालावधीत राज्य शिक्षण मंडळाच्या राज्यातील विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. हे येथे उल्लेखनीय आहे.
Discussion about this post