जीवघेणा हल्ला करणारे गुंड अद्यापही फरारच
गुंडांना बळ देणाऱ्या ‘आका’वर कठोर कारवाई करा; बीड घटनेची पुनरावृत्ती टाळा!
– अवैध सावकारीवरही अंकुश लावा – गंभीर जखमीच्या बहिणीची मागणी
नागपूर : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान खामला वस्तीतील गुंडांनी दोघांवर जीवघेणा हल्ला केला. यात कुठलाही दोष नसलेल्या अजय लधाराम पंजवानी या युवकासह अन्य एका युवकाला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. यातील अजय पंजवानी दहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत आहे. घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, अन्य पाच आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, असा सवाल गंभीर जखमी असलेल्या अजय यांची बहीण मोना पंजवानी यांनी उपस्थित केला आहे.
थोडक्यात घटना अशी की, खामला परिसरात 7 सप्टेंबरला गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीत खामला वस्तीतील काही गुंड लाठ्या, काठ्या आणि शस्त्र घेऊन होते. रात्री 11 ते 12 च्या दरम्यान अजय पंजवानी (37) हे लालवानी कॅम्प खामला कडून प्रताप नगर चौकाकडे आपल्या दुचाकीने जात होते. याच वेळी मिरवणुकीत सहभागी झालेले आरोपी रोहीत परते, सागर समुद्रे, राहुल समुद्रे, संदीप उर्फ गपू समुद्रे (सर्व रा. शिवनगर कॉलनी, खामला), भरत कश्यप (रा. व्यंकटेश कॉलनी, खामला) यांच्यासह समुद्रे गँग़मधील इतर काही गुंडांनी अजय यांना रस्त्यात अडविले. ‘तू सिंधी है क्या’ असे विचारले. होकारार्थी उत्तर येताच त्याला लाठ्या, काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अजय यांचा कुणासोबतही कुठलाही आर्थिक व्यवहार नसताना विनाकारण त्यांना मारहाण करण्यात आली. यात अजय बेशुद्ध पडले. याच दरम्यान तेथे आलेल्या अन्य एका सिंधी युवकालाही जीवानिशी मारण्याचे आदेश समुद्रे गँगमधील एकाने दिले. त्याच्यावर तलवार चालविली गेली. मात्र, त्यातून बचाव करत त्यांनी पळ काढला. यात ते किरकोळ जखमी झाले.
गंभीर जखमी अजय पंजवानी यांना प्रारंभी खामला येथील लाईफ केअर रुग्णालयात आणि नंतर सी.ए. मार्गावरील राहाटे हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. 7 सप्टेंबरपासून ते आय.सी.यू. मध्ये असून मृत्यूशी झुंज देत आहे.
या प्रकरणात झालेल्या दोन वेगवेगळ्या तक्रारींच्या आधारे राणा प्रतापनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. आरोपींपैकी तिघांना अटक केली. मात्र अन्य पाच आरोपी अद्यापही फरार असून त्यांना अटक का केल्या जात नाही, असा सवाल अजय पंजवानी यांच्या बहीण मोना यांनी उपस्थित करत तातडीने त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
अवैध सावकारीमुळे गुन्हेगारीला बळ : पीडितांचा आरोप
सिंधी कॉलनी परिसरात राहून वकिली व्यवसायाच्या आड अवैध सावकारी करणाऱ्या एका वकील दाम्पत्यामुळे अनेक जण त्रासले आहे. हजाराचे कर्ज देऊन लाखोंची वसुली करणारा शंकर उर्फ चिनू सुरेश लालवानी हा परिसरातील गुंडांना रसद पुरवित असतो. या गुंडांच्या भरवशावर तो व्याजाची वसुली करीत असतो. त्या मोबदल्यात या गुंडांच्या केसेस लढून तो त्यांना बळ देत असतो. यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे. या अवैध सावकारी करणाऱ्या ‘आका’ला पोलिसांनी वेळीच आवर घातला नाही तर खामला परिसरात अनेक लोकांचे जीव जातील, असा गंभीर आरोप लालवानीच्या सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणारा आणि त्यातून बचावलेला नानक बक्शालाल तेजवानी यांच्यासह पीडित रोशन जयसिंघानी, गगन वर्मा यांनी केला आहे.
-तर बीड घटनेची पुनरावृत्ती होईल
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण चांगलेच गाजले. या सर्व प्रकरणात अटक झालेल्या गुंडांचा ‘आका’ असलेल्या वाल्मिक कराड याच्यामुळे गुंडांची हिंमत वाढली होती. नागपुरातील खामला वस्तीतील गुंडांचा ‘आका’ वकिली व्यवसायात असलेला शंकर उर्फ चिनू सुरेश लालवानी हा असल्याचा गंभीर आरोप लालवानी याच्या सावकारी जाचामुळे त्रस्त असलेल्या पीडित नागरिकांनी केला आहे. लालवानी अशा गुंडांच्या केसेस हातात घेतो. खामला वस्तीतील गुंड हे मुद्दाम असे प्रकार ठरवून करत असतात. त्यांची केस लालवानी आपल्या हातात घेतो. जे पीडित असतात, त्यांच्यासोबत ‘सेटलमेंट’ करतो. हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. इतकेच नव्हेतर वकिली व्यवसायाआड लालवानी हा अवैध सावकरी व्यवसाय करतो. अनेकांना तो 9 ते 15 टक्के व्याजाने पैसे देतो. आर्थिक विवंचनेत असलेल्या नागरिकांना व्याजाच्या रकमेसाठी धमकावतो. त्याच्या या धमक्यांमुळे एकाने आत्महत्या केली आहे तर एकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वकील असलेली त्याची पत्नीही त्याला या गैरकृत्यात साथ देतो. विशेष म्हणजे, एक-दोनदा त्यांनी न्यायालायात खोटे शपथपत्र सादर करून चक्क न्यायालयाचीच दिशाभूल केल्याचेही उघड झाले आहे. लालवाणी दाम्पत्यांच्या अवैध सावकारीविरोधात काही तक्रारीही राणा प्रतापनगर पोलिस ठाण्यात झाल्या आहेत. मात्र, कायद्यात गंभीर मानल्या जात असलेल्या अवैध सावकारी या प्रकरणात राणा प्रतापनगर ठाण्याचे पोलिस मात्र गंभीर नसल्याचा आरोप आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या नानक तेजवानी, रोशन जयसिंघानी (40) आणि गगन वर्मा, रा. सिंधी कॉलनी खामला यांनी केला आहे. लालवानी यांच्या नेतृत्वात अवैध धंदे, गैरकृत्ये करणाऱ्यांची ही साखळी असून वेळीच यास पोलिसांनी पायबंद घातला नाही तर बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्याकांडासारखे प्रकरण घडण्यास वेळ लागणार नाही, अशी भीतीही पीडितांनी व्यक्त केली आहे. समुद्रे टोळीवर अपहरण, खून, मारहाण, असे अनेक गंभीर गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. लालवानी आणि समुद्रे टोळी हे संघटितपणे हे कृत्य करीत असून या सर्वांवर मोक्का लावण्यात यावा, अवैध सावकारी करणारा शंकर उर्फ चिनू सुरेश लालवानी यांच्याविरुद्ध असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्याला अटक करावी, समुद्रे टोळीचा कायमचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी सर्व पीडितांनी केली आहे.
…………………………………………………………………………………………………………………………………………..,














Discussion about this post