सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट.
गोंडवाना विद्यापीठ करणार गौरव,शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा*
*चंद्रपूर, दि.१५* – राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना मानाची डी.लिट. प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. पर्यावरण व वन्यजीव तसेच संस्कृती व ऐतिहासिक वारसा संवर्धन क्षेत्रात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे योगदान दिले आहे. डी.लिट.च्या माध्यमातून त्यांच्या या कार्याचा एकप्रकारे गौरव होणार आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या ११व्या दीक्षांत समारोहात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. प्रदान केली जाणार आहे. दि. ०४ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेत त्यांच्या नावाची शिफारस अधिसभेकडे करण्यात आली. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनुसार, ना. श्री. मुनगंटीवार यांना विद्यापीठाची सन्मान्य पदवी (D.Lit.) बहाल करण्यासंदर्भात संमती मिळण्याकरीता अधिसभेपुढे बाब ठेवण्यात आली. या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. डी.लिट. प्रदान करण्यासंदर्भात राज्यपाल तथा कुलपती श्री. रमेश बैस यांच्याकडून प्राप्त झालेल्या मान्यता पत्रानुसार दीक्षांत समारंभात प्रस्ताव सादर करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना डी.लिट. प्रदान करण्याचा प्रस्ताव कुलपती श्री. रमेश बैस यांच्याकडे सादर केला होता.
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना आजवर अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. १९९९ मध्ये राष्ट्रकुल संसदिय मंडळाच्या वतीने विधानसभेतील उत्कृष्ट आमदार, २००८ मध्ये अंध कल्याणाच्या क्षेत्रात उल्लेखनिय काम केल्याबददल राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या वतीने जी.एल. नर्डेकर स्मृती पुरस्कार, वृक्षारोपण मोहीमेच्या संदर्भात किर्लोस्कर वसुंधरा अवार्ड, लोकसेवा आणि विकास संस्थेचा कर्मवीर मासा कन्नमवार मेमोरियल अवार्ड, दैनिक लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर, इंडिया टूडे समुहाद्वारा दोन वेळा बेस्ट फायनान्स मिनिस्टर पुरस्कार, आफ्टरनुन व्हॉइस या संस्थेद्वारे बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर पुरस्कार, जे.सी.आय. महाराष्ट्र तर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्कार, फेम इंडिया तर्फे उत्कृष्ट मंत्री पुरस्कार अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
*नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंतांचे नाव देण्यासाठी संघर्ष*
नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात व बाहेर देखील मोठा संघर्ष उभा केला. विविध संसदीय आयुधांचा वापर करत विधिमंडळात सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यानंतर ही लढाई यशस्वी झाली. आता त्यांच्याच पुढाकाराने मोझरी येथील गुरुकुंज आश्रमाला ‘अ’ तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने जगभरातील गुरुदेव भक्तामध्ये आनंद व्यक्त होत आहे, हे विशेष.
*अमरावती, पुणे विद्यापीठाच्या नामकरणासाठी पुढाकार*
अमरावती विद्यापीठाला श्री संत गाडगेबाबा यांचे नाव तसेच पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे यासाठी देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी कसोशीने प्रयत्न केले. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावुन घेणे व पुण्यातील भिडे वाडयात क्रांतीज्योतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळेच घेण्यात आला.
विशेष प्रयत्न
चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्हयांसाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे स्थापन व्हावे यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. आज त्याच विद्यापीठातर्फे डी.लिट. जाहीर होणे हे ना.मुनगंटीवार यांच्यासाठी अभिमानाचा व त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव वाढवणारा आहे.
Discussion about this post