श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीचे कार्यानुभवी ब्र. लक्ष्मणदादा नारखेडे यांचा सहवास मला झाडीपट्टीत असतांना अनेकदा लाभला. कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य यांच्या पश्चात ते अड्याळ टेकडीवर ग्रामगीता तत्वज्ञानाचे धडे तेथे भेट देणा-या मंडळींना देत असत. ते ब्रम्हलिन होण्याच्या चार दिवसापुर्वी डाॕ. शिवनाथजी कुंभारे यांचे सोबत मी अड्याळ टेकडी वर त्यांना भेटण्यासाठी पोहचलो होतो . दादा आजारी होते , वय वर्षे ९१ सुरू असल्याने अशक्तपणाही खूप आलेला होता. डोक्याच्या बाजुला ग्रामगीता, चष्मा आणि काही कागद ठेवलेले होते.
डाॕ. कुंभारेजी म्हणाले , ” दादा, तुम्ही जवळपास महिनाभरापासून अन्नपाणी सोडल्याने शरीरातील रक्त , पाणी कमी झाले आहे, मी काही इंजेक्शन आणि सलाईन बाॕटल्स,ग्लुकोज पावडरही आणलेले आहे. मी डाॕक्टर असल्याने इलाज तर करणारच आहे.’ असे म्हणताच डाॕक्टरांनी सलाईन लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले . शरीरातील रक्तच कमी झाल्याने त्यांच्या हाताची नस सापडेना . मला तर केवळ त्यांच्या शरीराचा सापळाच भासत होता. श्वास तेवढा सुरू होता. दादा त्याही अवस्थेत खूप समाधानी दिसत होते . शेवटी ते डाॕ. शिवनाथजींना म्हणाले , ‘ आता शेवटी मला नका सुया टोचू . सलाईनचे औषध उरलेल्या हाडांवर नुसतेच पसरेल , आता काय उतरत्या वयात नवे रक्तमांस येणार आहे.शांतपणे पडून राहू द्या,’ असे म्हणत किंचितसे ते हसले आणि त्यांनी पुन्हा डोळे लावून घेतले. डाॕ.कुंभारे काहीसे थांबले आणि डाॕक्टरी कर्तव्य समजून शेवटी त्यांनी सलाईन लावलीच.
त्यांचे मुळ गाव नांदूरा जि. बुलढाणा. येथे त्यांचा दि. ८ जुलै १९२७ रोजी जन्म झाला. वडील शेतकरी. त्यांचा परिवार आधीपासूनच राष्ट्रसंताच्या विचारांनी भारलेला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी ते गीताचार्य दादांच्या प्रेरणेने भूवैकुंठ प्रयोगात सामील झाले. ब्रम्हपुरी तालुक्यातील किरमिटी अड्याळ गावाची जंगल सदृश्य रेव्हेन्यु लँन्ड वनमंत्री मधुकरराव चौधरी यांनी ग्रामगीतेच्या प्रयोगासाठी आणि तेथील साधकांच्या उपजिविकेसाठी दिली होती.वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि गीताचार्य श्रीतुकारामदादाच्या अथक प्रयत्नांनी या भूमीस तपोभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. ग्रामगीताप्रणित ग्रामसंरक्षण दल ,ग्रामसभा सक्षमीकरण , व्यसनमुक्ती , निसर्गोपचार , कुटीर उद्योग , खादी ग्रामोद्योग , लघु उद्योगाचे प्रशिक्षण येथे देण्यात येऊ लागले. दळणवळण , जनसंपर्क, विज आदीं प्रश्न ह्या प्रयोगासमोर होते. श्रमदान आणि स्वावलंबन ह्या तत्त्वविचारांचे धडे येथे देण्यात येत होते. गावोगावचे सेवाभावी मंडळी, साधक ,कार्यकर्ते येथे जमत होते. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम गीताचार्य श्रीतुकारामदादाच्या पश्चात लक्ष्मणदादांनी सक्षमपणे केले. तपोभूमी अड्याळ टेकडी येथील साधक कुट्या, सत्संग भवन ,गुरूपद गुंफा ,संतकुटी हे अध्यात्मप्रेमींना आपल्याकडे ओढून घेते. लक्ष्मणदादांनी अड्याळ टेकडी चा “ग्रामकुटूंबाचा” मोठा व्याप संयमाने सांभाळला.ते गावोगावी जाऊन ग्रामगीता प्रणित ग्रामविकासाचे सूत्र लोकांत रूजवू लागले . उर्जानगर (चंद्रपूर ) येथे भरलेल्या राज्यव्यापी राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते.
मी एकदा २०१६ मध्ये अड्याळ टेकडीवर मुक्कामाला होतो .सकाळी ब्रम्हमुहूर्तावर तयारी करून ध्यानपाठास जायचे होते. डाॕ. मुळे आणि मी सकाळी चार वाजताच टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीकडे चाललो होतो. विज नसल्यामुळे सर्वत्र अंधार पडला होता. त्या अंधारात टेकडीच्या पायऱ्या उतरताना भीती वाटत होती. कारण यापूर्वी अनेकदा मी त्या पायऱ्यावर नागासारखे सर्प फिरताना पाहिले होते . एकदा बिबट्या वाघ सुध्दा झाडावर चढलेला दिसला होता. अश्या ठिकाणाचे पायथ्याशी असलेल्या अंधाऱ्या वहिरीकडे जात असताना मात्र डाॕ. नवलाजी मुळे निर्भयपणे चालत होते. त्यांच्यामागे मी चाललो होतो. वहिरीजवळ येताच आवाज आला. कुणीतरी अंधारात बादलीने विहिरीतून पाणी काढत असल्याचे भासले. डाॕ. मुळेंना मी म्हणालो , “मुळेजी , इतक्या अंधारात चार वाजता विहिरीतून पाणी काढणारे कोण आहेत ?”. यावर डाॕ. मुळे म्हणाले , ” ते लक्ष्मणदादा आहेत, स्नान करण्यासाठी पाणी काढताहेत.” आम्हाला पाहुन दादा म्हणाले , ” “तुमच्याकरीताही पाणी काढून ठेवलेच आहे, तुम्ही स्नान करून घ्या,आणि ध्यानाला या.”
नोव्हेंबर महिना असल्याने थंडी खूप होती . पण थंड पाण्याच्या स्नानाने उष्ण उर्जा मिळाली. आम्ही ध्यान करण्यासाठी सत्संग भवनात पोहचत नाही तोच दादा तिथे आपली तयारी करून पोहचले होते. नेमून दिलेले कार्य स्वावलंबनाने करीत रहावे, या तत्त्वाचे ते होते. सन २०१५ मध्ये त्यांना किडनी कँन्सर झाला होता. तेव्हा ते पंचगव्य चिकित्सक डाॕ. निरंजन स्वामी (चेन्नई ) यांच्या आश्रमात चार दिवस मुक्कामाला होते . त्यांनी पंचगव्य चिकित्सा समजून घेत पथ्यपाणी पाळत वयाच्या ८८ व्या वर्षी या असाध्य आजारावर विजय मिळवला होता.सुमारे वर्षभर ते गोड वस्तू ,मीठ,तेल यापासून दूर राहिले.कठोर नियमांचे पालन केले.
प्राचीन भारतीय चिकित्सा पध्दती कशी फायदेशीर आहे, याबाबतचे स्वतःच्याचे उदाहरण समाजापुढे प्रस्तुत केले.
लक्ष्मणदादांनी सन १९३२ साली त्यांंनी हायर मॕट्रिकची परीक्षा चांदूरबाजार येथून उत्तीर्ण केलेली होती. ग्रामगीतेचे ते नियमित वाचक होते. त्यांची उपजत चिकित्सक वृत्ती असल्याने ते ग्रामआरोग्य मासिकात वैचारिक लेख लिहायचे. त्यांनी आजवर ९ पुस्तके लिहिली . शेतकऱ्यांचे रक्त पिणारे ढेकून, भारत महान पर पूंजीपतीयोंको गहान , नाणे एक बाजू दोन, आपले आरोग्य आपल्या हातात , ग्रामगीता प्रणित आधुनिक महाभारत आदी पुस्तकाचा त्यात समावेश आहे. ह्या पुस्तकातून त्यांंनी देशात चाललेल्या भौतिक साधनांचा अतिरेक , समाजातील वाढत्या अंधश्रध्दा , शेतकऱ्यांच्या दुरावस्था यावर कठोर भाष्य केलेले आहे. त्यामुळे त्यांची पुस्तके मोठ्या प्रमाणात मोझरी आणि अड्याळ टेकडीवर विकली जायची. तसेच त्यांंनी साप्ताहिक सत्संग, मासिक ग्रामआरोग्य आणि व्हाईस आॕफ तुकडोजी महाराज ह्या नियतकालिकांस योग्य दिशा दिली. जाहिरातीविना हे चालवणे फार कठीण काम असायचे . तसेच पंढरपूर येथील ग्रामगीता सक्रीय दर्शन मंदीर , मोझरी येथील ग्रामगीता गुरूकुल आणि जामधरी टेकडी (जि. नांदेड ) येथील बांधकाम लोकसहभागातून पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांंनी अथक परिश्रम घेतले.
सिंदेवाही जवळच्या पेंढरी येथे २३ वे झाडीबोली साहित्य संमेलन भरले होते. गीताचार्य श्रीतुकारामदादा यांच्या स्मृतीस हे संमेलन समर्पित केले होते. नारखेडेदादांच्या हस्ते संमेलनाचे उदघाटन झाले. त्यावेळी त्यांनी गावोगावी स्वच्छतेचा ध्यास धरा नाहीतर पुढे अनेक आजार बळावतील हे ध्यानात ठेवा, असे आवाहन केले होते. अस्वच्छतेमुळे वाढलेल्या रोगांच्या साथी आपण आज अनुभवत आहोतच.
लक्ष्मणदादांच्या मार्गदर्शनात २०१४ साली कर्मयोगी श्रीतुकारामदादा गीताचार्य जन्मशताब्दी महोत्सव अड्याळ टेकडी येथे घेण्यात आला होता. याप्रसंगी समाजसेवक अण्णा हजारे आणि सिंधूताई सपकाळ, सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी हजेरी लावली होती .तसेच २०१७ मध्ये अड्याळ टेकडीचा सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्यांना गीताचार्य श्रीतुकारामदादांच्या हस्ते सन १९९५ मध्ये अड्याळ टेकडीवर गीताजयंती दिनी समर्पित जीवन पुरस्कार देण्यात आला होता तर सांगडी बेला येथे भरलेल्या आंतरराज्य राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात तेलगांना चे तत्कालीन वनमंत्री ना. जोगू रामण्णा यांच्या हस्ते “राष्ट्रसंत साहित्य विचारकृती पुरस्कार ” प्रदान करण्यात आला होता.
शेवटच्या श्वासापर्यंंत लक्ष्मणदादा ग्रामगीता जगत पद,पैसा,संपत्ती आणि प्रसिद्धी पासून कायमच दूर राहिले.
दि.८/४/२०१८ रोजी नारखेडे दादा ब्रम्हलिन झाले. अड्याळ टेकडीच्या पायथ्याशी त्यांच्या पार्थिवावर अग्नीसंस्कार करण्यात आले. त्यांच्या चितेला त्यांची मोठी मुलगी उषाताई किनगे यांनी अग्नी दिला. अंत्यसंस्काराच्या रक्षा तेथील काही वृक्षाच्या मुळाशी टाकण्यात आली. नारखेडे दादांच्या इच्छेप्रमाणे कुठलेही कर्मकांड न करता ,समाधी वगैरे न बांधता त्या परिसरात तेथील साधकवर्गांनी ५० फळझाडांचे वृक्षारोपण केले. लक्ष्मणदादांच्या कार्यस्मृती आजही समाज कार्यकर्त्यांना प्रेरणा देत असतात.
– बंडोपंत बोढेकर,
शिवाजीनगर चंद्रपूर,
भ्रम.9422186765
Discussion about this post