नागपूर: – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावे यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीत नागपूर जिल्ह्याने 26 हजार घरे आणि 105 मेगावॅट वीज निर्मिती सौरौऊर्जा निर्मितीचा टप्पा ओलांडला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य ग्राहकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पात घराच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्याने वीजबिल शून्य होते. गरजेपेक्षा जास्त निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीजनिर्मिती केली जाते. त्यासाठी केंद्र सरकारकडून सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेनुसार एक किलोवॅटला 30 हजार रुपये, दोन किलोवॅटला 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅटच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान मिळते. जास्तीत जास्त अनुदान 78 हजार रुपये थेट अनुदान मिळते. महावितरणतर्फे ग्राहकांना नेट मिटर मोफत दिला जातो.
घरगुती ग्राहकांच्या मदतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी मागिल वर्षी 13 फेब्रुवारी रोजी ही योजना सुरू केली होती. नागपूर जिल्ह्यात 16 एप्रिल 2025 पर्यंत या योजनेत एकूण 26 हजार 588 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प बसविले गेले. त्यामध्ये 105.45 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली आहे. दि. 16 एप्रिल रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल 212 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले गेले.
राज्यात आतापर्यंत 1 लाख 79 हजार 753 घरांवर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले, त्यामध्ये 651.42 मेगावॅटची क्षमता निर्माण झाली आहे. यात नागपूर जिल्ह्याने सर्वाधिक 26,588 घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून आघाडी मिळविली आहे. त्याखालोखाल जळगाव (13,328 घरे), पुणे (12,775 घरे), छत्रपती संभाजीनगर (11,442 घरे), नाशिक (10,870 घरे), अमरावती (9,918 घरे), कोल्हापूर (8,017 घरे), धुळे (5,773 घरे), सोलापूर (5,441 घरे), अहिल्यानगर (5,197 घरे), वर्धा (4,871 घरे) हे जिल्हे योजनेचा लाभ घेण्यात आघाडीवर आहेत. राज्यातील एकूण सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्यातील सौरऊर्जानिर्मिती प्रकल्पांची आकडेवारी तब्बल 14.79 टक्के तर त्यामधून निर्माण होणा-या सौरनिर्मितीची क्षमता 16.42 टक्के आहे.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महावितरणकडे आहे. या योजनेतील ग्राहकांना मोफत नेट मीटर देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना https://pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी लागते.घरगुती वीज ग्राहकांना छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसविता यावा यासाठी बँकांकडून माफत व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जात आहे तसेच कर्जाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यास ग्रामीण ग्राहकांना प्रोत्साहन देणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे.
Discussion about this post