दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भीमपुत्र विनय भांगे यांना उमेदवारी
*विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा*
*तिकीट जाहीर होताच दिली पहिली प्रतिक्रिया; राजकारणातून समाजसेवा करण्याचा निर्धार*
नागपूर (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने 11 उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा केली आहे. यामध्ये नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी भीमपुत्र विनय भांगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विनय भांगे हे नागपूरातील एक शेतकरी परिवारातले आहेत आणि आंबेडकर परिवाराला समर्पित भांगे परिवाराची तिसरी पिढी आहेत. त्यांच्या आजोबांनी, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मिलिंद विद्यालयात शिक्षण घेतले आहे. त्यांच्या वडिलांनी नागपूरमध्ये आंबेडकरी चळवळीत महत्त्वपूर्ण कार्य केले आणि संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केले.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विनय भांगे वंचित बहुजन आघाडीचे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्या वेळी अवघ्या २५ वर्षांच्या तरुणाला उमेदवारी देऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी युवा पिढीवर विश्वास दाखविला होता. आता एकदा पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
विनय भांगे हे शिक्षित युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात, त्यांनी एलएलबी आणि एमबीए केले आहे. विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
यात दीक्षाभूमी बचाव आंदोलन, दीक्षाभूमी समिती रद्द करण्याची मागणी, आपली दीक्षाभूमी स्वच्छ भूमी स्वच्छता अभियान, माझे बुद्ध विहार स्वच्छ व सुंदर बुद्ध विहार अभियान, त्यांनी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत आरक्षण बचाओ यात्रेमध्ये ४००० किलोमीटरची रॅलीकाढण्यात सक्रियपणे सहभाग घेतला. विनय भांगे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर समुदायाचा विश्वास वाढला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट जाहीर झाल्यानंतर विनय भांगे यांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि युवा मंडळींची साथ घेऊन राजकारणातून समाजसेवा करण्याचा निर्धार मी केला आहे. मी बाळासाहेबांच्या विचारांचे स्वागत आणि समर्थन करतो.”
बहुजन वंचित आघाडीबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “ही आघाडी युवा नेत्यांना सोबत घेऊन नवचैतन्य निर्माण करत आहे. वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, माननीय बाळासाहेबांचा आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वास व आशीर्वाद घेऊन, मी नागपूर शहरातील पक्ष कार्यकारणी, लहान-मोठे कार्यकर्ते, मित्रपरिवार, आणि आप्तेष्टांच्या पाठिंब्याने निवडणूक लढणार आहे.”
त्यांनी सामाजिक आणि न्यायिक मुद्द्यांवर भर देत सांगितले, “मी समाजातील वंचित, शोषित घटकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करीत आहे. इतर पक्ष आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करत असताना, आम्ही वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेल्या संविधानातील आरक्षणातील बदल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि सामाजिक न्यायात फूट पाडणाऱ्या राजकारण्यांच्या विरोधात ठामपणे उभे आहोत.”
Discussion about this post