लाडकी बहिणींना पैसे मिळणार का?
‘लाडकी बहीण’ नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद
चंद्रपूर: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्यासाठी वेबसाईट बंद असल्याने अनेक बहिणी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. योजनेसाठी जी वेबसाईट उपलब्ध होती, ती आता बंद करण्यात आलेली आहे. राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख ७० हजारांवर महिला लाभार्थ्यांना महिन्याला दीड हजार रुपये थेट खात्यात मिळत आहेत. मात्र, आता नोंदणी प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून बंद झाल्यामुळे नोंदणी न केलेल्या अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या जिल्ह्यात ४ लाख ७० हजार अर्जांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी २ लाख ७५ हजार बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत संपूर्ण ४ लाख ७० हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले होते. लोकसंख्येच्या प्रमाणात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चंद्रपूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा क्रमांकात आहे. तथापि, काही महिलांचे आधार सिडिंग न झाल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर नोंदणीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांची सेतू केंद्रांमध्ये गर्दी दिसून आली. महिलांनी मोठ्या मेहनतीने दस्तऐवज गोळा करून अर्ज सादर केले. अनेक वयोवृद्ध महिलांनी, ज्यांना अन्य कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे. ६५ ते ७० वर्षांदरम्यानच्या अनेक महिलांना अजूनही पैसे खात्यात आलेले नाहीत.
शासनाच्या वतीने लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली आहे. रोजगार किंवा अन्य कारणामुळे जिल्ह्याबाहेर गेलेल्या अनेक महिलांना नोंदणीसाठी संधी मिळालेली नाही. नोंदणीची तारीख वाढवली गेली असली, तरी शहरात अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध नाही. तहसीलदार दीपक पुंडे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजना तांत्रिक अडचणीत सापडली आहे.
४ लाख ७० हजार बहिणी पात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात ४ लाख ७० हजार महिलांना पात्र ठरवले आहे. या महिलांना टप्प्याटप्प्याने अनुदानाचे पैसे मिळत आहेत; काहींना दुसऱ्या आणि काहींना तिसऱ्या टप्प्यात एकाच वेळी पैसे मिळाले आहेत.
बोगस अर्जाची संख्या किती?
अनेक योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या जिल्ह्यात मोठी आहे.
काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे आणि त्यांना लाभही मिळत आहे.
शिल्लक लाडक्या बहिणींचे काय?
महिला व बालविकास विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेची नोंदणी सप्टेंबर अखेर बंद झाली आहे. उर्वरित महिलांना नोंदणीची संधी उपलब्ध नाही. सरकारने याबाबत पुन्हा नोंदणी सुरू करणार का, अशी विचारणा महिलांकडून होत आहे.
Discussion about this post