विदर्भ सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा महासंघाची दोन दिवसीय त्रैमासिक सभा
नागपूर, १७ जानेवारी २०२४:
विदर्भ सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा महासंघाच्या दोन दिवसीय त्रैमासिक सभेचे आयोजन दिनांक १५ व १६ जानेवारी रोजी वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था, (वनामती), नागपूर येथे करण्यात आले होते. या सभेत विदर्भातील ६ जिल्ह्यांतील ९ ग्रामसभा महासंघांचे प्रतिनिधीनित्व करणाऱ्या ग्रामसभा सदस्यांनी सहभाग घेतला.ग्रामसभेच्या सशक्तीकरणासाठी कोअर टीमच्या सदस्यांचे सशक्तीकरण आवश्यक आहे, असे आवाहन अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी केले.
सभेच्या पहिल्या दिवशी विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप गोडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळचे संचालक डॉ. किशोर मोघे, ॲड. पोर्णिमा उपाध्याय, खोज संस्था, मेळघाट (अमरावती) यांनी सभेला उपस्थित विविध ग्रामसभांच्या सदस्यांना मार्गदर्शन केले.
सभेत विदर्भ महासंघाची रचना व कार्यपद्धती यांवर चर्चा करण्यात आली. सभेत उपस्थित ग्रामसभा सदस्यांनी महासंघाचे ध्येय आणि उद्देश, महासंघाची संरचना, महासंघाची कार्ये, आर्थिक व्यवस्था / व्यवस्थापन या मुद्द्यांवर आपापली मते व्यक्त केली.
सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना अपर आदिवासी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी ग्रामसभा आणि विदर्भ महासंघाच्या उत्थानासाठी शासन निर्णय योजना समजून घेऊन त्याचा पाठपुरावा व बदल सुचविणे अतिशय आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांनी पर्यावरण संरक्षण महत्वाचे असून वनांचे संवर्धन व तापमान वाढीमुळे शेतीचे उत्पन्न घटत आहे असेही सांगितले.
वनामतीच्या संचालिका डॉ. मिताली सेठी यांनी ग्रामसभा सदस्यांना मार्गदर्शन करताना आजच्या जगात प्रगतीच्या वाटेने जाण्याकरिता कायद्याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीस असणे आवश्यक आहे असे सांगितले. त्यांनी गावातील वंचित आणि मागास वर्गाला पाठिंबा व साहाय्य करायला हवे असेही सांगितले.
महाराष्ट्र बांबू बोर्डाचे कार्यकारी संचालक श्रीनिवास राव अतिरिक्त यांनी ग्रामसभा सदस्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून रानभाज्यांची लागवड आणि त्यांच्यापासून विविध उत्पादने तयार करणे सहज शक्य असल्याचे सांगितले.
विदर्भ निसर्ग संरक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप गोडे यांनी ग्रामसभेच्या उत्पन्नापैकी किमान २५% निधी सामायिक स्त्रोत व्यवस्थापनासाठी राखीव असलाच पाहिजे असे निरीक्षण देखील नोंदवले.
सभेच्या समारोपप्रसंगी मान्यवरांचे आभार महादेव गिल्लूरकर यांनी मानले. तर चर्चासत्राच्या संचलनाची जबाबदारी गुणवंत वैद्य यांनी घेतली.
सभेत उपस्थित ग्रामसभा सदस्यांनी महासंघाच्या रचना व कार्यपद्धतीवर पुढील कामकाज सुरू करण्यासाठी शिफारसी केल्या. या शिफारसीनुसार महासंघाची अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न केले जातील.
Discussion about this post