राणी सुशील गजभिये यांनी एक एकर शेतीत केली लागवड
नागपूर : नागपूरच्या राणी सुशील गजभिये यांनी जंगली लवकीपासून नाईट लॅम्प ( night lamps) बनवून एक नवीन कल्पना साकारली आहे. याला “तूंबा शिल्पकला” असे देखील म्हणतात. ही लवकी चवीने कडू असते, परंतु तिचे आवरण अतिशय आकर्षक असते. गजभिये यांनी या आवरणावर रंगरंगोटी आणि सजावट करून नाईट लॅम्प बनवले आहेत. ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ग्रामायण सेवा प्रदर्शनात हे नाईट लॅम्प ठेवण्यात आले आहेत.
नागपूरच्या टेका नाका येथे राहणाऱ्या राणी सुशील गजभिये यांची वर्धा जिल्ह्यातील सेलू परिसरात सहा एकर शेती आहे. यातील एक एकरमध्ये जंगली लवकीची लागवड केली. या लागवडीसाठी बिया पेरल्या जातात किंवा रोहिणी पद्धतीने लागवड केली जाते. या वेलांना बकरीच्या लेंढ्याचे शेणखत दिले जाते. काही कालावधीनंतर ही लवकी मोठी झाल्यावर ती मुख्य वेलापासून तोडून जमिनीवर ठेवले जाते. नैसर्गिक पद्धतीने ते सुकविली जाते. सुकल्यानंतर त्याचा आतील भाग कापून काढला जातो. या नैसर्गिक पात्राला आदिवासी तुंबा म्हणतात. तुंबामध्ये ठेवलेले पाणी जास्त काळ थंड राहते. लांबचा प्रवास करताना आदिवासी त्यात शीतपेये ठेवत असत. त्याला देसी थर्मास असेही म्हणतात. मात्र आधुनिकतेच्या युगात तुंबा कला नामशेष होत आहे. मात्र, राणी सुशील गजभिये यांनी ही कला जिवंत ठेवण्यासोबतच रोजगार निर्माण केला आहे. त्यांनी तुंबा कलेला नव्या रूपात जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. लवकीच्या आतील गाभा काढून टाकल्यानंतर शिल्लक आवरणावर नक्षीकाम, रंगरंगोटी आणि सजावट केली जाते. यासाठी विविध रंग, डिझाइन आणि नक्षी वापरल्या जातात. वाळलेल्या तुंब्यावर विविध सुंदर कलाकृती कोरतात आणि त्यांना मोहक आणि आकर्षक बनवितात. नाईट लॅम्पमध्ये वीज दिवा लावता येतो. या नाईट लॅम्पमुळे घरात आकर्षक प्रकाश पडतो. गजभिये यांनी बनवलेल्या या नाईट लॅम्पला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामायण सेवा प्रदर्शनात या नाईट लॅम्पची चांगली विक्री होत आहे. गजभिये यांच्या या कल्पनेमुळे जंगली लवकीचे महत्त्व वाढले आहे.
Discussion about this post