चंद्रपूर विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांचे आवाहन
चंद्रपूर : राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. काँग्रेस प्रदेश कमिटीचे प्रांताध्यक्ष श्री. नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरुन या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. चंद्रपूर विधानसभा मतदार संघ (अनुसूचित जाती) निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारानी अर्ज सादर करावेत, असे आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.
येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीसाठी कार्यक्रम नियोजन जाहीर होईल. त्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उमेदवार जाहीर करण्यासाठी इच्छुकाकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांचा अर्ज प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात दि. १०/८/२०२४ पर्यंत जमा करावेत. विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण वर्गासाठी रुपये २०,०००/- (अक्षरी रुपये वीस हजार मात्र) आणि अनु. जाती, अनु. जमाती, व महिला उमेदवारांसाठी रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) याप्रमाणे रक्कम पक्षनिधी म्हणून रोख अथवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या नांवे डी. डी. द्वारे प्रदेश कार्यालयाकडे किंवा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत.
जे उमेदवारी अर्ज जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये जमा होतील ते उमेदवारी अर्ज पक्षनिधीसह प्रदेश कार्यालयाकडे उपरोक्त दिनांका पुर्वी सादर करावेत, असे आव्हान देखील जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.
Discussion about this post