नागपूर, ९ नोव्हेंबर २०२४:* वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भिमपुत्र विनय भांगे यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभेतील रामबाग येथे आयोजित प्रचार सभेत घराणेशाही आणि जातीय राजकारणावर तीव्र टीका केली. “गेल्या ७५ वर्षांपासून देशात घराणेशाहीचे साम्राज्य बळावत आहे. सर्व राजकीय पक्षांनी हीच परंपरा चालू ठेवली आहे. परंतु वंचित बहुजन आघाडी हा एकमेव अपवाद आहे ज्याने नवीन नेतृत्वाला संधी दिली आहे. माननीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी मला उमेदवारी देऊन वंचित बहुजन समाजाला पुढे नेण्याचे कार्य सुरू ठेवले आहे,” असे भांगे यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले.
त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवित म्हटले की, “राहुल गांधी यांनी लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संविधान बचाव असा नारा दिला. सगळीकडे संविधानाची लाल प्रत घेऊन ते फिरतात, परंतु परदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा करतात. त्यांचा हा खरा चेहरा आहे. ते केवळ वंचित बहुजन समाजाला मतासाठी वापरतात. काँग्रेसचे नेते मधुसूदन मिस्त्री यांनी ‘आंबेडकर या नावाची काँग्रेसला गरज नाही’ असे विधान करून विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा अपमान केला आहे.”
*दुटप्पी भूमिका उघड*
भाजपवरही टीका करताना भांगे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात अर्ज भरताना संविधान चौकातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन व माल्यार्पण केले, पण यावेळी त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामचे नारे दिले. असे करण्यामागे त्यांचा हेतू काय होता ? हा बाबासाहेबांचा सन्मान आहे कि अपमान आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
*आरक्षणाचा बचाव आणि संविधानाचे रक्षण करण्याची शपथ*
भांगे यांनी ठामपणे सांगितले की, “भाजप आणि आरएसएसच्या चड्डीवाल्यांचे पवित्र दीक्षाभूमीवर अतिक्रमण आणि विद्रुपीकरण करण्याचे प्रयत्न सुरु होते. पण ते आपण सर्वांच्या साथीने आम्ही हाणून पाडले. परत त्यांनी जर असा प्रयत्न केला, तर त्यांच्या ढुंगणावर दंडुके मारल्याशिवाय राहणार नाही.” त्यांनी संघर्षाची हाक देत, “संविधानातील आपल्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आपण एकत्र येणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणासाठी सात नंबरचे बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला विजयी करा,” असे आवाहन केले.
या सभेला मंचावर वंचित बहुजन आघाडी शहर कार्यकारिणीतील प्रमुख नेते राजूभाऊ लोखंडे, रविभाऊ शेंडे, सौ. संगीताताई गोधनकर, प्रसन्नाकुमार दुरूगकर आणि संजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post