बुलडाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर 7 मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे साडे 5 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एकूण 3 जण ठार, तर 4 जण जखमी झालेत.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
चिखलदरा तालुक्यातील मोरगाव येथील 10 मजूर रोजगाराच्या शोधात नांदुरा येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर लागले होते. ते महामार्गालगतच्या वडनेर भोजली गावालगत एका झोपडीत झोपले होते. सोमवारी पहाटे साडे 5 च्या सुमारास एका भरधाव ट्रकने (पीबी 11 सीझेड 4047) या झोपडीला धडक दिली.
त्यात 7 जण चिरडले गेले. त्यापैकी प्रकाश बाबू जांभेकर (26) व पंकज तुळशीराम जांभेकर (18) हे दोघे जागीच ठार झाले. तर अभिषेक रमेश जांभेकर (18) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजा जादू जांभेकर व दीपक खोजी बेलसरे हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना अमरावती येथील रुग्णालयात शिफ्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
१. स्वच्छता ही सेवा अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज 154 व्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनगड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवरांनी गांधीजींच्या स्मृतींना वंदन केले. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देशभरातून आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. दरम्यान गांधीजींना अभिवादन म्हणून काल देशभरात स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानामध्ये देशभरात नागरिकांनी मोठ्या उत्साहान सहभागी होत आपला परिसर स्वच्छ केला.
२. वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची आज घोषणा
नोबेल पारितोषिक 2023 च्या विजेत्यांची घोषणा आजपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून सुरू होईल. यावर्षी नोबेल पुरस्कारासाठी 351 उमेदवार आहेत. आज वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केले जाणार आहेत. नोबेल पारितोषिक 1901 मध्ये सुरू झाल्यापासून 2022 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 225 लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
३.स्पेनच्या नाईट क्लबला आग, 13 जणांचा मृत्यू
स्पेनच्या मर्सिया शहरातील एका नाईट क्लबमध्ये रविवारी आग लागली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झालाय. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर क्लबचे छत कोसळले. ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.
४.आदिवासी विद्यापीठाची निर्मितीची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगाणाच्या महबूबनगर दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी येथे 13,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. तेलंगणातील जनतेने परिवर्तन घडवून आणण्याचे ठरवले आहे, आता गरज आहे पारदर्शक आणि प्रामाणिक सरकारची. राज्यातील जनतेने भाजपला बळ दिले आहे. आता तेलंगणात भाजपचे सरकार असावे, असे मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी मुरुगल जिल्ह्यात केंद्रीय आदिवासी विद्यापीठाची निर्मिती करण्याची घोषणा केली.
५. कमलनाथ यांचा विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कमलनाथ हे मध्य प्रदेशकाँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. ते पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरतील, अशी चर्चा होती, परंतु त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत.
६. हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात
मणिपूरमध्ये पुन्हा सुरू झालेल्या हिंसाचारामागेही खलिस्तानी दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झालंय. कॅनडात खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतर कुकी समुदायाच्या एका वरिष्ठ नेत्याने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूसोबत बैठक घेतल्याचे पुरावे गुप्तचर यंत्रणांना मिळालेत. कॅनडाच्या सरे येथील गुरुद्वारात आयोजित खलिस्तानी समर्थकांच्या बैठकीचा व्हिडीओ भारतीय यंत्रणांना मिळाला आहे.
७. १५६ ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार
भारतीय हवाई दल हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) आणखी १५६ ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. भारतीय हवाई दल त्यांना चीन आणि पाकिस्तान सीमेवर तैनात करणार आहे. त्यामुळे दोन्ही सीमेवरील सुरक्षाव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल.
८. आता मंगळावर आणखी एक अंतराळ यान
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आता मंगळावर आणखी एक अंतराळ यान पाठवण्याची तयारी करत आहे. इस्रोने आपल्या पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत एक अंतराळ यान यशस्वीपणे स्थापित केले होते. त्यानंतर आता नऊ वर्षांनंतर पुन्हा एकदा मंगळावर स्वारी करण्याची तयारी इस्रोने केली आहे.
९. आदिल मुश्ताकला निलंबित करण्याचे आदेश
जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीएसपी शेख आदिल मुश्ताक यांना गेल्या महिन्यात दहशतवाद्यांशी संबंधात अटक करण्यात आली होती. आता केंद्रशासित प्रदेशाच्या गृह विभागाने आदिल मुश्ताकला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. आदिल मुश्ताकने दहशतवाद्यांना मदत करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रशासनाच्या तपासात समोर आले आहे.
१०. सात मजुरांना भरधाव ट्रकने चिरडले
रोजगाराच्या शोधात मेळघाटातून बुलडाणा येथे गेलेल्या 7 मजुरांना भरधाव ट्रकने चिरडल्याची हृदयद्रावक घटना बुलडाणा तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली आहे. सोमवारी पहाटे साडे 5 च्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एकूण 3 जण ठार, तर 4 जण जखमी झालेत.
११. मालवाहू ट्रक पलटी झाल्याने किमान 10 स्थलांतरितांचा मृत्यू
दक्षिण मेक्सिकोमधील एका महामार्गावर गुप्तपणे स्थलांतरितांना घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटी झाल्याने किमान 10 स्थलांतरितांचा मृत्यू झाला आणि 25 जण जखमी झाले. ग्वाटेमालाच्या सीमेजवळ मेक्सिकोच्या चियापास राज्यात रविवारी पहाटे हा अपघात झाला.
१२. आत्मघाती हल्लेखोराने संसदेजवळ स्वत:ला उडवले
तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे एका आत्मघाती हल्लेखोराने संसदेजवळ स्वत:ला उडवले. या स्फोटानंतर अंकारा शहरात खळबळ उडाली. या आत्मघातकी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे अतिशय भयानक आहे. स्फोटामुळे दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत.
१३. दागिन्यांचा आणि इतर ऐवजांचा लिलाव
गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांचा आणि इतर ऐवजांचा लिलाव रविवारी पार पडला. एक किलो वजनी सोन्याचा हार, तसेच चांदीची गदा आणि सोन्याचा मुलांना दिलेला मुकुट हे या लिलावाचे आकर्षण ठरले. भाविकांनी पाच कोटी सोळा लाखांच्या वस्तू व रोकड अर्पण केली आहे. यामध्ये एका भाविकाने बाप्पाला इलेक्ट्रिक दुचाकीही अर्पण केली होती.
१४. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे अमेरिकेत कौतुक
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या अमेरिका भेटीदरम्यान मोदी सरकारच्या काळात भारत-अमेरिका संबंध वेगळ्या पातळीवर नेण्याबाबत बोलले होते. बायडेन यांच्या प्रशासनाने एस जयशंकर यांचे कौतुक केले आहे. अमेरिका-भारत संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी एस जयशंकर यांना दोन्ही देशांमधील आधुनिक संबंधांचे शिल्पकार म्हटले आहे.
१५. ज्येष्ठ नेते अजय माकन यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पवन कुमार बन्सल यांच्या जागी ज्येष्ठ नेते अजय माकन यांची कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध म्हणून ओळखले जाणारे माकन यांनी काही महिन्यांपूर्वी राजस्थानच्या काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ही महत्त्वाची भूमिका स्वीकारली आहे.
१६. दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मान्सूनने परतीचा निरोप घेण्यास सुरुवात केली असताना, हवामान विभागाने दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळेल. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळ पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
१७. बँक कर्मचारी-अधिकारी संघटना संपावर जाणार
निवृत्ती, पदोन्नती, मृत्यू आदी कारणांमुळे बँकांमधील मनुष्यबळ कमी होत आहे. त्या तुलनेत पदभरती होत नसल्याचे चित्र आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर बँक कर्मचारी-अधिकारी संघटना संपावर जाण्याच्या विचारात आहेत.
१८. सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना झालेत. लंडनला निघण्यापूर्वी त्यांनी मुंबई विमानतळावरच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल.
१९. पाच दिवसांचा वाहतूक ब्लॉक
मुंबईतील हार्बर मार्गावर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी पनवेल येथे ३८ तासांचा ब्लॉक संपल्यानंतर आणखी पाच दिवसांचा वाहतूक ब्लॉक घेणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसेल.
२०. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच तयारीला सुरु केली आहे. सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पुण्यात होणार आहे.
२१. पदक गमावल्यानंतर स्वप्ना बर्मनने या खेळाडूवर केले गंभीर आरोप
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाच्या चमकदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर हेप्टॅथलॉन स्पर्धेत पदकाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. भारताची हेप्टॅथलॉन ऍथलीट स्वप्ना बर्मन आशियाई क्रीडा 2023 मध्ये तिच्या विजेतेपदाचे रक्षण करू शकली नाही आणि ती सहकारी भारतीय नंदिनी आगासरापेक्षा फक्त 4 गुणांनी मागे राहून चौथ्या स्थानावर राहिली.
२२. ‘द व्हॅक्सिन वॉर’ पाहणाऱ्यांना एक मोफत तिकीट
विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटगृहांच्या जागा भरण्यासाठी ‘द व्हॅक्सिन वॉर’ संदर्भात खास ऑफर चालवली आहे. आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ पाहणाऱ्यांना एक मोफत तिकीट आणि दुसरे तिकीट मिळेल. विवेकने सोशल मीडियावर पोस्ट करून याचा खुलासा केला आहे.
२३. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अनुष्का आणि क्रिकेटर विराट कोहली दुसऱ्यांदा आईबाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत अद्याप अनुष्का आणि विराटकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.
२४. मिचेल स्टार्कच्या हॅट्ट्रिकने भारताला धोक्याची घंटा
येत्या ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या आधी सराव सामने खेळवले जात आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातला सामना पावसामुळेच २३-२३ षटकांचा खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने हॅट्ट्रिक घेऊन भारतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे.
Discussion about this post