गणेश विसर्जनादरम्यान चंद्रपुरात शोककळा; युवकाचा बुडून मृत्यू
**चंद्रपूर, 28 सप्टेंबर 2023:** चंद्रपूर जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. म्हातारदेवी-शेंनगाव तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला आहे. सुमित बाळा पोंगळे (वय 20) असे मृतकाचे नाव आहे.विसर्जना दिवशी पाहुण्याचा मृत्यू झाल्याने पोंगळे व मस्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घुग्घूस येथील साईनगर वार्डातील दत्तात्रय मस्के यांच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आज महाप्रसादाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्यातील सुमित बाळा पोंगळे हा त्यांचा भाचा आला होता.
आज विसर्जन करण्यासाठी संपूर्ण परिवार व नातेवाईक म्हातारदेवी- शेंनगाव रस्त्यावरील तलावात गेले होते. गणरायाची विधिवत पूजा, आरती करून तलावात विसर्जन करण्यासाठी सर्व उतरलेत. विसर्जन झाल्यावर सुमितने डुबकी मारली. मात्र त्याला पाण्याचा अंदाज आला नाही.
तलावात जेसीबीने खोल खड्डे खोदले गेले होते. या खड्यात सुमित फसला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती घुग्घूस पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरू केली. शोधमोहिमे दरम्यान सुमितचे प्रेत आढळून आले. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
Discussion about this post