चंद्रपूर: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली. राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातसुध्दा ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक दहा वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत वाहून गेल्याची घटना घडली आहे. सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोधकार्य सुरू आहे. दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे (३०) हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता. त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला. मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला. उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता.
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले. यापैकी 3 दरवाजे एक मीटरने तर 30 दरवाजे अर्ध्या मिटरने उघडले. धरणातून 1 लाख 12 हजार 921 लिटरने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली. पावसाने थोडी विश्रांती घेताच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली. काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
नागपूर येथील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय (डागा) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या शासकीय रुग्णालयांना पावसाच्या तडाख्याचा चांगलाच फटका बसला. मेडिकलच्या बऱ्याच वार्डात पाणी शिरल्याने रुग्णशय्येखाली पाणी साचले. या स्थितीतही रुग्णांवर उपचार केले गेले
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेले दोन ते तीन दिवस राज्याला मान्सूनचा तडाखा बसत आहे. मुंबई कोकण किनारपट्टीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. सातत्याने पावसाचा मारा सुरु असल्याने शहरातील सखल भागात रात्रीपासून पाणी साचले आहे. मुंबईत 20 आणि 21 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा वेध शाळेने दिला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना धोकादायक पातळी ओलांडली आहे. मुंबईत रात्रीपासून सलग पाऊस कोसळत आहे.20 जुलै रोजी रात्री समुद्रात रात्री नऊ वाजताच्या दरम्यान भरती असल्याने समुद्र किनाऱ्यावर आठ ते दहा फूटांच्या लाटा उसळ्याचा अंदाज आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
——-
41 दिवसांनी लागणार आचारसंहिता
उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच, नुकतेच राज्यातील महायुती सरकारचे यंदाच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन पार पडले. त्यामध्ये, विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. त्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करुन महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यावरुन, विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही या योजनांवरुन सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंगच फुंकलं आहे.
Discussion about this post