बोलोरो पिकअपची मोटारसायकलला धडक
संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.२६ :
दुचाकी वाहनाला बोलोरो पिकप गाडीने जबर धडक दिल्याने दोन चिमुकल्यासह आईचा जागीच करून अंत झाला.तर मोटार सायकल चालक गंभीर जखमी आहे.सदर घटना आज दिनांक २६ जानेवारीला दुपारी चार वाजेच्या दरम्यान नवेगावबांध अर्जुनी मोरगाव राज्य मार्गावर नवेगावबांध शिवारात भारती बार व रेस्टॉरंट नजीक घडली आहे. मृतक चीतेश्र्वरी संदीप पंधरे (वय २६ वर्ष),मुलगा संचित संदीप पंधरे( वय ५ महिने) व शेजारी पार्थिवी रोहित सिडाम(वय ३ वर्ष) हे सर्व नजीकच्या येरंडी देवलगाव येथील रहिवासी आहेत.
या अपघातामुळे आज प्रजासत्ताक दिनी येरंडी देवलगाव येथील पंधरे व सिडाम कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.येरंडी गावावर सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथून नजीकच्या येरंडी देवलगाव येथील संदीप राजू पंधरे( वय२९ वर्षे ) हे दुपारी चार वाजेच्या दरम्यान आपल्या स्वगाव येरंडीवरून नवेगावबांधकडे काही कामानिमित्त आपल्या पल्सर मोटार सायकल क्रमांक एमएच ३५,एएम २७५६ वर स्वार होऊन,पत्नी चीतेश्र्वरी संदीप पंधरे (वय २६ वर्ष),मुलगा संचित संदीप पंधरे( वय ५ महिने) व घरा शेजारी असलेली पार्थिवी रोहित सिडाम(वय ३ वर्ष) यांच्यासह येत असताना मागून अर्जुनी मोरगाव कडून येणाऱ्या बोलोरो पीकअप गाडी क्रमांक एमएच ३५,एजे ४४८२ या अज्ञात वाहन चालकांचा गाडीवर नियत्रंण सुटून दुचाकीला मागून जबर धडक दिली.यात दुचाकीवर स्वार असलेल्या चीतेशवरी संदीप पंधरे ,संचित संदीप पंधरे व पार्थिवी रोहित पंधरे यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला आहे.
दुचाकी चालक संदीप पंधरे गंभीर जखमी झाले असून, त्यांना ब्रम्हपुरी येथील रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगिता चाफले व त्यांची चमू घटना स्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून तिन्ही मृतकाचे प्रेत शवविच्छेदनाकरिता नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताला कारणीभूत असलेल्या बोलोरों पीक अप चालक दुर्घटना स्थलावरून पसार झाला, नवेगावबांध पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पुढील तपास ठाणेदार चाफले करीत आहेत.
Discussion about this post