छत्तीसगडमधील एका परिवारातील कर्ता माणूस असाध्य रोगाने ग्रासलेला. असेल-नसेल तेवढी रक्कम गाठीला बांधून त्याची पत्नी आपल्या लहानग्या पोरासोबत नागपूर गाठते. रामदासपेठेतील एका खासगी दवाखान्यात उपचाराकरिता दाखल करते. उपचारासाठी येणारा 20 हजारांचा खर्च कोठून आणायचा, हा तिच्यासमोरचा प्रश्न…गळ्यातलं मंगळसूत्र विकून कशीबशी पैशाची तजवीज करते. उपचार सुरू होतात. दुसरीकडे लहानगं पोर भूकेनं व्याकूळ. त्याचं पोट कसं भरायचं, ह्या विचारानं ती व्याकूळ होते. रस्त्यावर येते. काही लोकांसमोर हात पसरते. लहानग्या पोराचं पोट भरण्यासाठी दोन पैसे देण्याची विनंती करते. यातच एकाचं लक्ष तिच्यावर जातं. दोन तास माझ्यासोबत घालव, तलि पैसे देतो असं म्हणून तिच्यासमोर ‘ऑफर’ ठेवतो. त्या बाईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. ह्या घटनेचा साक्षीदार असलेला एक हळव्या मनाचा कार्यकर्ता एका संवेदनशील नेत्याला तातडीने ही घटना सांगतो. संवेदनशीलच तो… त्या महिलाचा पती उपचारासाठी जोपर्यंत नागपुरात आहे तोपर्यंत त्या मायलेकाच्या पोटाची व्यवस्था करतो. मात्र, या साऱ्याच घटनेने तो कमालीचा अस्वस्थ होतो. नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था का असू नये, या अस्वस्थतेतू ‘दीनदयाळ थाली’चा जन्म होतो. जी दीनदयाळ थाळी रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांची भूक अवघ्या 10 रुपयांत भागविते तिने लॉकडाऊन काळात दररोज सुमारे 11 हजार लोकांचे मोफत पोट भरले. आज दररोज 1200 रुग्णांचे नातेवाईक दीनदयाळ थाळीचा लाभ घेतात. ही समाजसेवा ज्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीच्या हातून घडत आहे, समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांनीच त्याला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा दिली, तो व्यक्ती म्हणजे आमदार संदीप जोशी…!
स्वत:विषयी अगदी हातचं राखून बोलणारा हा व्यक्ती स्वत:विषयी अगदी हातचं राखून बोलतो. परोपकाराविषयी हा माणूस स्वत:हून कधीच सांगत नाही. कुठल्या गोष्टीचं श्रेय घेण्याचा कधी प्रयत्नही करत नाही. ‘‘जे करतो, ते माझे कार्य आहे, स्वप्न आहे. माझ्या समाधानासाठी हे मी करतोय. कदाचित हे कार्य करण्यासाठीच ईश्वराने मला येथे आणलं,’’ हे सांगताना या व्यक्तीतील मोठेपणा दिसायला लागतो. त्यांचे हेच विचार त्यांना कितीतरी मोठे करुन जातात. समाजसेवा करायची असेल तर त्याचा डंका कशाला पिटायचा? प्रसिद्धीसाठी समाजसेवा कधीच करायची नसते, असे म्हणणारे संदीप जोशी आपले आदर्श केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानतात. ‘माणसानं नेहमी 80 टक्के समाजकारण करावं. केवळ 20 टक्के राजकारण करावं, ह्या नितीनजींच्या वाक्याला त्यांनी अंगात भिनवलंय. राजकारणाचा उपयोगच आपण समाजकारणासाठी करत असतो, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. समाजकारण करण्यासाठी राजकारणाची पायरी चढल्याचं ते मनमोकळेपणानं सांगतात.
पूर्वीचे महापौर आणि आताचे आमदार संदीप जोशी यांची ओळख जरी राजकारणातला माणूस अशी असली तरी ते राजकारणी कमी आणि समाजकारणी अधिक आहेत. या दोन क्षेत्रासोबतच त्यांनी आपल्या आवडी-निवडीही जोपासल्या आहेत. एक चांगला कलावंत, एक चांगला गायक, एक चांगला खेळाडू, एक चांगला प्रशासक, एक चांगला व्यवस्थापक ही संदीप जोशींची ओळख आहे.
त्यांना कलाक्षेत्राची प्रचंड आवड आहे. अभिनय त्यांच्या ठायी ठायी आहे. कॉलेजकाळात अर्थात बारावीत असताना डॉ. हेडगेवार यांच्यावर तयार होत असलेल्या चित्रपटासाठी ‘ऑडीशन’ सुरू होती. रेशीमबाग येथील संघ मुख्यालयाच्या सभागृहात संदीप जोशी नावाचा कॉलेजकुमार ऑडीशनसाठी पोहोचला. अभिनयावर असलेली पकड आणि दुर्दम्य आत्मविश्वास या जोरावर संदीप जोशी यांची डॉ. हेडगेवार ह्या प्रमुख भूमिकेसाठीच निवड झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राजदत्त यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. डॉ. हेडगेवार यांच्या वयाच्या 16 व्या वर्षापासून ते मृत्यूपर्यंतच्या भूमिकेत संदीप जोशी या चित्रपटात दिसले. संदीप जोशी यांच्या भूमिकेला यशवंत दत्त यांनी आवाज दिला. अभिनेते नाना पाटेकर यांचे निवेदन या चित्रपटाला होते. चित्रपट पूर्ण झाला आणि संदीप जोशी यांच्या भूमिकेची वाहऽऽवा झाली. यानंतर त्यांनी अनेक नाटकांमध्ये भूमिका वठविल्या. काही वर्षाअगोदर त्यांनी एका महानाट्यात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चांगलाच भाव खाऊन गेली.
संदीपजींसारख्या हरहुन्नरी व्यक्तीने आपली प्रत्येक आवड जोपासली. गाण्याचा छंद नव्हे तर अनेक वर्षांपासून ते छंद म्हणून गातात. ज्यांना ज्यांना त्यांच्यातील हा गुण माहिती आहे, अशा व्यक्तींनी त्यांना आग्रह केला तर मैफल चांगलीच रंगते. सूर चढत जातात आणि मैफलीत रंग भरू लागतो.
संदीपजींवर त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार. आई शिक्षिका, वडील शिक्षक. नागपुरातीलच इतवारी हायस्कूलमध्ये ते पूर्वी चपराशी होते. पुढे तेथेच शिकून त्याच शाळेत शिक्षक झालेत. घरात संघ संस्कार. वडिलांनी संदीपवरही तेच संस्कार केले. शिस्त त्यांच्या अंगी बाणवली. वडिलांनी त्यांच्या शिक्षकी काळात शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. नेतृत्व करताना त्यांनी अडचणीत आलेल्या अनेकांना न्याय मिळवून दिला. याच त्यांच्या नेतृत्वाची दखल राजकीय नेतृत्वाने घेतली. 1986 मध्ये दिवाकरराव जोशी शिक्षक आमदार झाले. आमदारकीच्या काळात त्यांनी आपले तत्व सोडले नाही. घरची परिस्थिती बेताचीच. कठोर शिस्त आणि परिस्थितीचे चटके यातून लहानग्या संदीपला बरेच काही शिकायला मिळाले. शुद्धलेखन केले नाही, संघाच्या शाखेत गेले नाही तर उपाशी झोपावे लागत होते. वडिलांचा हा धाक आयुष्यभरासाठी कामात आला. या धाकातूनच अंगी शिस्त बाणवली, ज्याचा फायदा आज होतो आहे, असे संदीपजी अभिमानाने सांगतात.
वडील आमदार असल्याने मुलाने राजकीय क्षेत्रात यावे, असा एक मतप्रवाह होता. मात्र, मी आमदार असल्याने पुन्हा त्या घरातीलच व्यक्ती राजकारणात नको, हे वडिलांचे तत्व होते. त्यामुळे मुलाने राजकारणात येऊ नये, आपण आमदार असेपर्यंत संदीपला तिकीट मिळू नये, अशी त्यांची भूमिका होती. वडिलांची ही भूमिका ठरलेली असल्यामुळे संदीपजींसाठी राजकारण प्रवेशाचे मार्ग बंद झाले होते. राजकारणाचा विचार त्यांनी डोक्यातून काढला. जे.सी. ॲण्ड सन्समध्ये 700 रुपये प्रति महिना वेतनावर सेल्समनची नोकरी स्वीकारली. काही काळ तेथे घालविल्यानंतर निप्पो बॅटरीजमध्ये नोकरी केली. यानंतर पार्क डेव्हिस मल्टीनॅशनलमध्ये सहा जिल्ह्याचे सेल्स ऑफिसर म्हणून दोन-अडीच वर्षे काम सांभाळलं. याच काळात वडिलांची प्रकृती ढासळली. ऑरेंज सिटी हॉस्पीटलमध्ये भरती केलं. यावेळी वडिलांनी जवळ बोलावून मुलाला अर्थात संदीपला आपली खंत बोलून दाखविली. ‘मी तुझ्यावर अन्याय केला. तुझ्यात नेतृत्वगुण आणि प्रतिभा असताना तुला राजकारणापासून दूर ठेवले. मी माझे शब्द मागे घेतो. तू तुझ्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार राजकारणात प्रवेश कर’, असं त्यांनी म्हटलं, ही आठवण सांगताना संदीपजी आजही भावुक होतात.
वडिलांच्या इच्छेनुसार सन 1998 मध्ये तेव्हाची 20 हजार रुपयांची लठ्ठ पगाराची ोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. उदरनिर्वाहासाठी घरी डीटीपी सेंटर टाकले. पत्नी शिवणकाम करायची. या दोन्हीतून जगण्यासाठी दोन पैसे कमावित राजकारणाचा प्रवास त्यांनी सुरू केला. वडिलांचा आशीर्वाद, पत्नीची भक्कम साथ जोडीला होती. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तेव्हाच्या नेतृत्वात पश्चिम नागपूर युवा मोर्चा, शहर युवा मोर्चा महामंत्री, शहर अध्यक्ष असा प्रवास सुरू झाला. सन 2002 मध्ये त्यांनी पहिल्यांदा नागपूर महानगरपालिकेची निवडणूक लढविली. सासरे प्रकाश साठे नगरसेवक होते. ते उत्कृष्ट सायकलपटू होते. राजकारणात त्यांची भक्कम साथ मिळाली. तेव्हा निवास नरेंद्र नगरला होता. मात्र, निवडणूक रामदासपेठ येथून लढविली. या काळात त्यांनी युवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केलीत. त्या काळात विविध आंदोलनामुळे सन 2007 पर्यंत त्यांच्यावर 46 गुन्हे दाखल होते. हे सर्व गुन्हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, बेरोजगारीच्या प्रश्नासाठी उभारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेले होते. सन 2010 मध्ये पक्षनेतृत्वाने विश्वास टाकून त्यांना मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष बनविले. या काळात नितीनजींच्या मार्गदर्शनात सर्व प्रकल्पांना त्यांनी संजीवनी दिली. सीमेंट रस्ता प्रकल्प असो, 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना असो, लंडन स्ट्रीट प्रकल्प असो, कविवर्य सुरेश भट सभागृह असो, या सर्व प्रकल्पांची कामे त्या काळात सुरू झाली. पुणे येथील एका संस्थेद्वारे महाराष्ट्रातील महापालिकांमधील उत्कृष्ट स्थायी समिती सभापती म्हणून प्र.के. अत्रे पुरस्कार देण्यात येतो. हा मानाचा पुरस्कार सन 2010-11 साठी तत्कालिन नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती संदीप जोशी यांना देण्यात आला. मनपाच्या 52 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा संदीप जोशी हे सलग दुसऱ्या वर्षीही स्थायी समिती सभापती झालेत. यानंतर मनपाच्या विविध समित्यांवर सभापती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सन 2017 मध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा मान त्यांनी पटकाविला.
एकीकडे राजकारणात आपल्या कर्तृत्वाने वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या संदीप जोशी यांनी समाजसेवेचा वसा कायम ठेवला. संजय नहार यांनी काश्मीरमधील काही मुलांना नागपुरात आणले होते. त्यातील दोन मुलांचा दिवाळीतील मुक्काम संदीपजींच्या घरी होता. अनाथाश्रमात जाऊन दिवाळी साजरी करणे, वंचितांसाठी किंवा आर्थिक परिस्थितीमुळे दिवाळी साजरी करु न शकणाऱ्या घटकांसाठी तेलंगखेडीच्या पायथ्याशी दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करणे, वेश्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेणे अशी अनेक कामे त्यांच्या हातून घडली. धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, कीर्तन महोत्सव असे कार्यक्रम आयोजित करून सतत नागरिकांना जुळवून ठेवण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. कोरोनाकाळात पतीचे निधन झाल्यावर एकल पालकत्वाची जबाबदारी आलेल्या विधवा महिलांसाठी संदीप जोशी भावासारखे धावून आले. अशा स्त्रियांना आधार देण्यासाठी ‘सोबत पालकत्व प्रकल्प’ जन्माला आला. या महिलांच्या पाल्याचा पुढील शिक्षणाची जबाबदारी ‘सोबत पालकत्व प्रकल्पा’ने स्वीकारली. आज या प्रकल्पाला पाच वर्षे पूर्ण झाले. 263 महिला या प्रकल्पाशी जुळल्या असून त्यांचे पाल्य विनाअडथळा शिक्षण घेत आहेत. या सर्व महिला रक्षाबंधनाला राखी बांधून आणि भाऊबीजेला ओवाळून आपल्या भावाप्रति अर्थात संदीप जोशी यांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त करतात.
पुण्यात दिवाळी पहाटची संकल्पना आहे तर नागपुरात का नाही, हे डोक्यात घेऊन नागपुरात सन 2002 मध्ये पहिले ‘दिवाळी पहाट’चे आयोजन संदीप जोशी यांच्या पुढाकारातून झाले. आज नागपुरात सुमारे 60 ते 70 दिवाळी पहाट कार्यक्रम होतात. सन 2013 मध्ये आरोग्य शिबिर आणि सन 2015 मध्ये ना. नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन त्यांनी केले. सुमारे 40 हजार नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. दुसऱ्या वर्षीही आयोजन केले. अनेक शस्त्रक्रिया मोफत केल्या. नितीनजींच्याच वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावाचं खोलीकरण केले. 10 हजार ट्रक गाळ काढला. आता पाऊस आला की हा तलाव तुडुंब भरलेला असतो.
राजकारण आणि समाजकारणाच्या या समुद्रात ‘दीनदयाळ थाळी’ हा मनाला अतीव आनंद देणारा प्रकल्प असल्याचे संदीप जोशी सांगतात. ‘मी जेव्हा नर्व्हस होतो, डिस्टर्ब होतो तेव्हा दीनदयाळ थाळीच्या कॅम्पसमध्ये जातो. तिथे गेल्यानंतर मला माझी किंमत कळते. माझ्यातील अहंकार गळून पडतो. कारण तेथे अनेक दु:ख बघायला मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.
एकदा एक नवरा-बायको चार वर्षांच्या मुलास थाळी घेऊन होते. क्षमतेपेक्षा अधिक अन्न त्या थाळीत होते. त्यांना विचारले तेव्हा त्या दाम्पत्याच्या डोळ्यात पाणी आलं. गडचिरोलीचं ते कुटुंब होतं. त्या चार वर्षाच्या मुलाला डोळ्याचा कॅन्सर होता. त्याची किमोथेरपी सुरू होती. किमो झाल्यावर त्याला खूप भूक लागते. म्हणून ती थाळी तुडुंब भरलेली होती, असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा संदीपजींचेही डोळे पाणावले. ‘माझे कुठलेही प्रकल्प बंद झाले तरी चालतील मात्र, दीनदयाळ थाळी हा प्रकल्प अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहील’, असं ते भावुक होऊन सांगतात. समाजात दु:ख खूप आहे. ते आपण अगदी थोड्या प्रमाणात दूर करू शकलो, तर त्याचं समाधान मला मिळतं, असंही ते सांगतात.
दीनदयाळ रुग्णसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य प्रकल्प राबविले जातात. शासकीय रुग्णालयांना अनेक आवश्यक वस्तू भेट दिल्या. चालता-फिरता दवाखाना हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू आहे. झोपडपट्टीत नियमित आरोग्य तपासणी, मोफत औषधपुरवठा यामाध्यमातून केला जातो. दीन-दलितांची, वंचितांची सेवा करीत राहणे, हाच या प्रकल्पांमागील उद्देश असल्याचे ते सांगतात.
आमदार संदीप जोशी क्रीडांगणावरही मागे नाहीत. ते मुळात कबड्डीपटू. बास्केटबॉलच्या दोन क्लबचे ते अध्यक्ष होते. प्रथम नागपूर बास्केटबॉल संघटना आणि आता ते महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाच्या संयोजकपदाची जबाबदारी ते लीलया पार पाडत आहेत.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य अर्थात आमदार बनल्यानंतर संदीप जोशी यांच्या कामाचा वेग पुन्हा वाढला. लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या ऐकायच्या आणि त्या सोडवायचा हा त्यांचा नियमित कार्यक्रम आहे. लोकांना अत्यावश्यक कागदपत्रे तयार करणे सोयीचे व्हावे यासाठी त्यांनी स्वत:च्या कार्यालयातच ‘आपलं सरकार’ केंद्र तयार केले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुक बँक तयार करून अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली.
आमदार संदीप जोशी म्हणजे संकल्पनांचे भांडार आहे. त्यांच्या संकल्पना ह्या नेहमीच इतरांपेक्षा वेगळ्या राहिल्या आहेत. प्रत्येक संकल्पना अभिनव असते. नागपूर शहरातील सुंदर रस्त्यांवर कुठल्याही एका प्रजातीची झाडं रस्त्याच्या दुतर्फा लावावे आणि तो रस्ता त्या झाडांच्या नावाने ओळखला जावा, ही अफलातून संकल्पना त्यांनी राबविली. गणेशमूर्ती विसर्जनामुळे पाणी प्रदूषण होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या घराजवळील गणेश मंडळात धातूची मूर्ती प्रतिष्ठापना करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला. ‘माय व्हॅलेन्टाईन, माय नागपूर’ ही संकल्पना शहराविषयी प्रेम व्यक्त करणारी ठरली तर ‘मम्मी पापा यू टू’ या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता दूत’ बनविण्याची आगळीवेगळी संकल्पना सत्यात उतरविली. महापौर असताना कोव्हिड काळात त्यांनी केलेले कार्य हे अतुलनीय होते. नागरिकांच्या भीतीचे निरसन करण्यासाठी त्यांनी सुरू केलेला ‘कोव्हिड संवाद’ हा संपूर्ण राज्यात चर्चेचा ठरला होता.
आमदार संदीप जोशी यांनी राजकारणात राहून केलेल्या विकासकामांची यादी मोठी आहे. मात्र, त्यांच्या समाजकारणापुढे ही यादी अगदीच छोटी आहे. केलेल्या कामांचे गुणगान करणे हा त्यांचा स्वभावच नाही. त्यामुळे अनेक कामे नागरिकांपुढे येत नाही. स्वस्तुतीची त्यांना प्रचंड चीड आहे. कोणी विरोधात बोलत असेल तरी त्याच्या खांद्यावर मित्र म्हणून प्रेमानेच हात ठेवणाऱ्या संदीपजींचे राजकारणात क्वचितच शत्रू असतील. जे संदीपजींना जवळून ओळखतात ते संदीपजींसाठी साने गुरुजींच्या दोन ओळी नेहमीच पुटपुटतात….
खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे
जगी जे दीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगला प्रेम अर्पावे..!
आज संदीपजींचा वाढदिवस. या लोकनेत्यास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! त्यांच्या हातून नेहमी
च पीडित, वंचितांसाठी नेहमीच सत्कार्य घडत राहो, हीच सदिच्छा…!















Discussion about this post