Chandrapur: कोरपना तालुक्यातील नारंडा गावातील भवानी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि. ३) पायव्याचे खोदकाम करताना प्राचीन कोरीव पाषाण सापडले. या घटनेने गावकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून पाषाण पाहण्यासाठी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांची दिवसभर गर्दी उसळली.
नारंडा येथील भवानी माता मंदिर अत्यंत प्राचीन मानले जाते. जुने मंदिर पडल्यामुळे काही वर्षांपूर्वी नवे मंदिर बांधले गेले होते. जुन्या मूर्ती खंडित झाल्यानंतर नव्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आल्या होत्या. सध्या मंदिराला भव्य स्वरूप देण्यासाठी गावकऱ्यांच्या पुढाकाराने आणि भाविकांच्या सहकार्याने जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. याच कामाचा भाग म्हणून खोदकाम करताना भूमीत दबलेले पाच कोरीव पाषाण आढळले. स्थानिकांमध्ये हे अवशेष जुन्या मंदिराशी संबंधित असल्याची चर्चा आहे.
परमार काळातील अवशेष

इतिहास अभ्यासक अशोक सिंग ठाकूर यांनी या अवशेषांचा अभ्यास करताना ते १२-१३ व्या शतकातील परमार कालीन असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे या शोधाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
कोरपना तालुक्यातील नारंडा, अंतरगाव, सांगोडा, देवघाट, कुसळ, दुर्गाडी, रुपापेठ, सिंगारपठार, कारगाव, कोडशी बूज, तामसी, चनई खू, जांभूळधरा, गडचांदूर, इजापुर आदी गावांमध्ये अशा प्रकारचे अनेक पुरातन अवशेष आढळतात. मात्र त्यांचे जतन न झाल्याने स्थानिक इतिहास लुप्त होण्याचा धोका आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने लक्ष घालून या वारशाचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.












Discussion about this post