नागपूर 04/09/2025 :- इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) २०२५ मध्ये मुक्त विद्यापीठ श्रेणीमध्ये प्रथम स्थान मिळविले आहे. यामुळे भारतातील मुक्त व दूरस्थ शिक्षण (ओडीएल) आणि ऑनलाईन शिक्षणातील अग्रणी म्हणून इग्नूची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना, इग्नूच्या कुलगुरू प्रो. उमा कांजीलाल यांनी इग्नू परिवारातील सर्व सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. हे यश आमच्या प्राध्यापकवर्ग, शैक्षणिक व अशैक्षणिक कर्मचारी यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.
इग्नूमध्ये आमचे ध्येय स्पष्ट आहे – सर्वांना, सर्वत्र, स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे. पुढे जाताना, देशाच्या अतिदुर्गम भागांपर्यंतही सहज पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आम्ही डिजिटल आणि तांत्रिक साधनांचा अधिकाधिक वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करू. शिक्षण अधिक समावेशक आणि विद्यार्थी-अनुकूल पद्धतीने पोहोचावे यासाठी आम्ही स्थानिक भाषा, मल्टिमीडिया, व्हिडिओ-आधारित साधने आणि मिश्रित अध्यापन पद्धतींचा वापर वाढवत राहू.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २०१५ मध्ये स्थापन केलेली एनआयआरएफ रँकिंग ही देशभरातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यमापन व क्रमवारी करते. यात अध्यापन, अध्ययन व साधने, संशोधन व व्यावसायिक पद्धती, पदवीधर परिणाम, आऊटरीच व समावेशकता तसेच प्रतिमा अशा निकषांचा समावेश होतो. उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी या रँकिंगला प्रमाण मानले जाते.
मुक्त विद्यापीठ श्रेणीमध्ये सलग दुसऱ्यांदा शीर्ष स्थान मिळवून, इग्नूने पुन्हा एकदा समावेशक आणि ज्ञानाधारित समाजाच्या निर्मितीत मुक्त व दूरस्थ शिक्षणाची महत्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. भारत आणि विदेशांतील विशाल विद्यार्थी आधारासह, हे विद्यापीठ जगातील सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ म्हणून शिक्षण व तंत्रज्ञानामध्ये सतत नवनवीन प्रयोग करत आहे.
















Discussion about this post