विदर्भ आठवडी आणि राजू बिट्टूरवार
चंद्रपूर शहरात पूर्वी साप्ताहिकाच्या संपादकांना त्यांची वृत्तपत्रे तयार करून देणे अर्थात पेज डिझाईन करून देण्याचे काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे राजू बिट्टूरवार. भिवापूर वॉर्डातील छोट्याशा घरात एका संगणकावर त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. त्यावेळी ते साप्ताहिक वृत्तपत्रांच्या डिझाईन आणि बातम्या टाईप करून देण्याचे काम करत होते. पुढे त्यांनी ज्येष्ठ पत्रकार सुरेश धोपटे यांच्यासोबत राहून पत्रकारितेचे धडे घेतले. इथूनच त्यांच्या पत्रकारितेची सुरवात झाली.
धोपटे काकांच्या मार्गदर्शनाखाली राजू बिट्टूरवार यांनी पत्रकारितेची बारकावे शिकली. त्यांनी विविध विषयांवर लेखन केले आणि वृत्तपत्रांसाठी बातम्या संकलित केल्या.
राजू बिट्टूरवार यांनी पुढे “विदर्भ आठवडी ” नावाचे साप्ताहिक सुरू केले. हे साप्ताहिक आजही प्रकाशित होत आहे. या माध्यमातून ते विविध सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्याचे काम करत आहेत. विशेषतः अभियांत्रिकी दिनानिमित्त त्यांची पुरवणी प्रसिद्ध होत असते. या पुरवणीत ते अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संशोधन आणि विकासाबद्दल माहिती देतात. इतकेच नव्हेतर आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीत दर्पणदिनी पत्रकारांवर विशेष पुरवणी काढून त्यांचा गौरव करण्याचे काम राजूभाऊ करीत असतात.
विशेषतः त्यांनी सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकला आहे. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व केले आहे.
2010 मध्ये सुरेश काका धोपटे आणि बंडू धोत्रे यांच्या संघर्षावर देवनाथ गंडाटे व जितेंद्र मशारकर यांच्या मदतीने “सन्मान कर्तृत्वाचा” हे पुस्तक प्रकाशित केले होते. राजू बिट्टूरवार हे एक निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकार आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील अनेक समस्यांना वाचा फोडली आहे. आता काळानुरूप बदल करून त्यांनी डिजिटल माध्यमातून आपली पत्रकारिता कायम सुरू ठेवली आहे.
सात ऑक्टोबर रोजी त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
– देवनाथ गंडाटे
Discussion about this post