भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या “पत्रकारांना धाब्यावर न्या” कथित ऑडिओनंतर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावर मिश्किल टीका करणारी कविता हेरंब कुलकर्णी आणि ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिली आहे.
चला, आपण धाब्यावर जाऊ… ही कविता तुफान वायरल

मी त्यांना म्हणालो
पाण्यात तरंगणारे तुमचे
नागपूर शहर आपण पाहू
ते म्हणाले
नको नको,
त्यापेक्षा आपण,
धाब्यावरच जाऊ…..!!!
धाब्यावर जाताच, मी म्हणालो-
दारू दुकाने वाढवण्याची,
निषेधार्ह बातमी दाखवू का ?
ते म्हणाले ” हवी ती चव
आत्ता तुम्हाला चाखवू का ?”
मी विचारले सहजपणे ,
समृध्दी महामार्गावर,
अपघात का बरे वाढले ?
प्रश्न दाबायला त्यांनी मग
पाकीटच बाहेर काढले …..
न्यायमूर्ती लोया नागपुरात,
नेमके कशाने वारले ?
उत्तर म्हणून त्यांनी,
समोर मेन्यू कार्ड धरले …
शेतकरी आत्महत्या भागात,
दौऱ्यावर कधी जाऊ या ?
ते म्हणाले सांगा ,
जेवणाची ऑर्डर काय देऊ या ?
मी विचारले कंटाळून,
अच्छे दिन आता
सांगा ना कधी येणार ?
ते म्हणाले सांगा आधी,
तुम्ही गिफ्ट काय घेणार ?
कंटाळून विचारले शेवटी मी –
९ वर्षापासून लावलेल्या स्वप्नांची
रोपटी आता कधी वाढायची ?
त्यांनी विचारले,
पत्रकारांची
ताडोबात ट्रीप कधी काढायची ?
आजूबाजूला सगळे मद्यपी बघत
आम्ही धाब्यावरून निघत होतो..
सत्तेची नशा करते, किती बेधुंद
हे त्यांच्या डोळ्यात बघत होतो..
हेरंब कुलकर्णी
————-
राती धाब्यावर बसू ना मित्रा!
कशाला आमचे काढतोस लफडे
कशाला नुसते फाडतोस कपडे
प्रेमाने हसू ना मित्रा..
राती धाब्यावर बसू ना मित्रा !!धृ!!
‘खिर-सेवैय्या’ वगैरे जाऊ दे
आपला ‘सोमैय्या` बाजूला राहू दे
कशाला नसल्या छापायच्या बातम्या
नकोस फसू ना मित्रा..
राती धाब्यावर बसू ना मित्रा !!१!!
तुला व्हॉट्स ॲप केले पहा
गाडी पाठवतो तयार रहा
विदेशी दारू.. बंपर मारू..
आरपार धसू ना मित्रा
राती धाब्यावर बसू ना मित्रा !!२!!
नको उगाच फुगवू छाती
किती जणांची झालीया माती
मुजोर वागले, भिकेला लागले
नको रे डसू ना मित्रा..
राती धाब्यावर बसू ना मित्रा !!३!!
गोमूत्र, सोमरस किंवा दारू
हवा तर थोडा गांजाही मारू
‘विश्वगुरू’ची होईल मर्जी
मनात ठसू ना मित्रा..
राती धाब्यावर बसू ना मित्रा !!४!!
ऐक सल्ला ‘बावनकुळी’
नाही चिंता उरणार मुळी
महिनावारी `दक्षिणा’ ठरवू
मजेत असू ना मित्रा..
राती धाब्यावर बसू ना मित्रा !!५!!
–
ज्ञानेश वाकुडकर
नागपूर २६/०९/२०२३
धाब्यावर घेऊन बसा??
*****************
अशी कशी बातमी छापून येते
अबे!त्यांचा गरम करा खिसा.
एवढ्या न मानत नसतील तर,
त्यायले धाब्यावर घेऊन बसा !!
सत्ता आणण्यासाठी लय केलं
जाती धर्मात लावले झगडे.
इडीची पेटवून बिडी विरोधात,
बोंबलणारे जमा केले सगळे.
रोज खोट्याचं खरं करतांना,
आमचा कोरडा पडतो घसा||१||
धाब्यावर ‘विकास’ बसवला
धाब्यावर गुंडाळून नियम.
देव भोळी जनता आपली,
आंधळ्या भक्तीत कायम.
लई बतोली केले तेव्हा,
अडकला जाळयात मताचा मासा||२||
रेटून आमचं खोटं बोलणं,
त्यायले लयी खरं वाटते लेका.
आपले नारे लावणारे खुश,
त्याले संडास बांधाचा ठेका.
चँप, सीना, गर्दन आपण दाबू,
उरला त्यायच्या वाटेले रस्सा||३||
आरक्षण उपोषण वाल्यांना
तेवढं मरतानांच पाहायचं.
‘आयोग’ नावाचा देऊन बतोला,
फक्त बोलून मोकळं व्हायचं.
मराठाओबीसी धनगरांनो त्यांची
तुम्ही मरेस्तोवर गांड घासा||४||
महिलांसाठी असू दे नाहीतर,
कुठल्या जातीपातीचा आरक्षण.
म्हणजे लग्न होण्याआधी थेट,
लबाडाचं बारशाले आवतण.
सत्तेच्या शर्यतीत हारतो कसा,
आमचा एवढा चपळ ससा||५||
बेरोजगार डिग्री शेतकऱ्यांना फास
चौफेर उधळते अदाणीचा घोडा.
शिक्षीत कत्रांटी हमाल भरती,
होतील बंद सरकारी शाळा.
मोर्चा उपोषण नारे देऊन,
आमच्या जीवन मरणाचा हासा||७||
खेमराज भोयर

७७९८८२२७६४
Discussion about this post