आजच्या जगात, युट्यूब हे मनोरंजन आणि शिक्षण यासाठी अत्यंत लोकप्रिय साधन बनले आहे. जगभरातील अब्जावधी लोक दररोज युट्यूब व्हिडिओ पाहतात आणि त्याचा आनंद घेतात. युट्यूबवर तुम्हाला अनेक प्रकारचे व्हिडिओ मिळू शकतात, जसे की संगीत व्हिडिओ, चित्रपट, टीव्ही शो, बातम्या, शिक्षण व्हिडिओ, आणि बरेच काही आहे. काही लोक आकर्षक आणि मनोरंजक व्हिडिओ तयार करून सबस्क्राईबर किंवा फॉलोअर्सला आकर्षित करतात, तर काही लोक विशिष्ट विषयांवर तज्ञ म्हणून विविध विषयांच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना शिक्षित करण्याचे काम करीत आहेत. यातून आजच्या डिजिटल युगात, युट्यूब हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर आर्थिक कमाईचे साधनही बनले आहे. जगभरातील लाखो लोक युट्यूबवरून पैसे कमवत आहेत. महाराष्ट्र राज्यातील अनेक तरुणांनी युट्यूबला रोजगाराचे साधन बनविले आहे.
विनायक माळी हा टॉप मराठी युटूबर आहे, जो कॉमेडी विडिओ बनवतो त्याच्या प्रत्येक व्हिडीओवर लाखो व्यूज येतात. कूकिंगबद्दल सर्च करत असाल तर तुम्हाला मधुरा रेसिपी हे चॅनेल नक्की पाहायला मिळेल. स्री वर्गात मधूरा रेसिपी विशेष प्रसिद्ध आहे. राजश्री मराठी हे चित्रपट व संगीत या विषयी व्हिडिओ बनवतात. मनोरंजन आणि लघु मालिकासाठी भाडीपा चॅनेल प्रसिद्ध आहे. त्यांची बी.ई.रोजगार ही एक फेमस सिरीज आहे. मराठी किडा चॅनेल वर तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांच्या भाषा , राहणीमान बघायला मिळेल.
विदर्भामध्येही अनेकांनी डिजिटल मीडियातून प्रसिद्धी मिळविली आहे. वर्ध्याचे नितेश कराळे गुरुजी, अमरावतीतील तीवसा येथील विजय खंडारे, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर का छोकरा फेम आशिष बोबडे, नेहा ठोंबरे, अश्विनी मस्के, नागपूरचा डॉली चहा वाला या सारख्या अनेक तरुणाचा समावेश आहे. युट्यूबवरून पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही तुमच्या व्हिडिओवर गुगल एडसेन्स द्वारे जाहिराती लावू शकता. जेव्हा एखादी व्यक्ती तुमची जाहिरात पाहते किंवा त्यावर क्लिक करते तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात. तुम्ही तुमच्या व्हिडिओसाठी प्रायोजक शोधू शकता. प्रायोजक तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या उत्पादनाचा किंवा सेवेचा उल्लेख करण्यासाठी पैसे देतील.तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये एफीलिट लिंक टाकू शकता.

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या लिंकवर क्लिक करते आणि खरेदी करते तेव्हा तुम्हाला कमिशन मिळते. तुम्ही देखील नवीन विषयावर व्हिडिओ तयार करून रोजगार मिळवू शकता. नवीनतम तंत्रज्ञान आणि गॅझेट्सची माहिती, विविध विषयांवर शैक्षणिक व्हिडिओ, परीक्षा आणि स्पर्धांसाठी तयारी, प्रेरणादायी आणि शैक्षणिक कथा, व्यायाम आणि फिटनेस टिप्स, आहार आणि पोषण, मानसिक आरोग्य आणि कल्याण, कला आणि हस्तकला प्रकल्प व कलाकारांना मुलाखती, स्टार्टअप आणि उद्योजकता, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन, पाककृती व्हिडिओ, सौंदर्य आणि मेकअप ट्यूटोरियल बनवू शकता. आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना जगापुढे आणण्यासाठी आजच व्हिडिओ बनवा.

डिजिटेक | देवनाथ गंडाटे
7264982465
डिजिटल मीडिया अभ्यासक
Discussion about this post