ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 चे थाटात उद्घाटन
नागपूर, 22 डिसेंबर 2023: ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने तसेच नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023 चे उद्घाटन आज थाटात पार पडले.
येत्या 22 ते 26 डिसेंबर या काळात रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित असलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक श्री. राजेशजी लोया आणि वर्धा येथील सुप्रसिद्ध सर्वोदय कार्यकर्त्या श्रीमती डॉ. विभा गुप्ता (अध्यक्ष – मगन संग्रहालय समिती, वर्धा संस्थापक आणि संचालक ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, वर्धा), रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे, सचिव संजय सराफ, पश्चिम नागपूर नागरिक मंडळाचे रवी वाघमारे उपस्थित होते.
सुविधांचा अभाव तरीही चांगल्या कलाकृती तयार करण्यास सक्षम
याप्रसंगी प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक श्री. राजेशजी लोया म्हणाले, “ग्रामीण भागातील लोकांना सुविधांचा अभाव असला तरीही ते चांगल्या कलाकृती तयार करण्यास सक्षम आहेत. स्वदेशीची भावना निर्माण झाल्यास त्या वस्तू खरेदी होऊन समाजापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातील या वस्तूंची स्तुती करून त्यांचे कौशल्य आणि कलाकृतीची दाद दिली पाहिजे. पर्यावरण, आरोग्य आणि सामाजिक सेवा या क्षेत्रातही ग्रामीण भाग पुढे जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात कलेतून रोजगार निर्मितीसाठी कौशल्य शिक्षणाची गरज
वर्धा येथील सुप्रसिद्ध सर्वोदय कार्यकर्त्या श्रीमती डॉ. विभा गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, “बांबूच्या राखेतून अनेकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे महिला आत्मनिर्भर होत आहेत. कारागिरांना रोजगार शिक्षण आवश्यक आहे. तंत्रज्ञान, अवजार आणि साहित्य उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातून कलेतून रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल.”
कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले, तर आभार राजेंद्र काळे यांनी मानले. उद्घाटन प्रसंगी सरस्वती वंदन पंकज रंगारी यांनी सादर केले तर उद्घाटन सोहळ्याच्या समारोपिय कार्यक्रम प्रसंगी श्रावणी बुजोने हिने ग्रामायण गीत सादर केले.
या प्रदर्शनामध्ये बांबूपासून निर्मित साहित्य, लोणचे, पापड, नाचणीचे पदार्थ, स्वेटर, बॅग, मातीची भांडी, ज्वेलरी, हर्बल पेस्ट, गुड, ड्रायफूड, मसाला पावडर, खादीचे कपडे, महिलांचे साहित्य, घरगुती वापराच्या वस्तू, आयुर्वेदिक वनस्पती, औषधी, आयुर्वेदिक मेडिसिन प्लांट आदींचे स्टॉल लागलेले आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून विदर्भातील ग्रामीण भागातील विविध प्रकारच्या पारंपारिक वस्तू आणि साहित्याची ओळख शहरी नागरिकांना होईल आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होईल. प्रदर्शनात ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या कलाकारांची कलाकृती पाहायला मिळत आहे. या प्रदर्शनातून ग्रामीण संस्कृतीचे जतन होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
उद्घाटन सोहळ्यानंतर सेवा संस्था आणि समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यासाठी संवाद सत्र झाले. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सहयोग क्लस्टर, नागपूर यांच्या संयुक्त सहकार्याने हे संवाद सत्र पार पडले.या संवाद सत्रात सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सेवा संस्था आणि समाजकार्य महाविद्यालये यांच्यातील सहकार्य कसे वाढवता येईल, यावर चर्चा झाली. यात विविध महाविद्यालयाचे प्राचार्य विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
वेणुशिल्पी स्व. सुनील देशपांडे विश्वकर्मा कलाकार / कारागीर दालनाचा शुभारंभ
ग्रामायण सेवा प्रदर्शन २०२३ मध्ये उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वेणुशिल्पी स्व. सुनील देशपांडे विश्वकर्मा कलाकार / कारागीर दालनाचे फित कापून शुभारंभ करण्यात आला. या दालनामध्ये बांबू, लाकूड, कापड, काच, धातू इत्यादी विविध साहित्यातून तयार केलेली विविध प्रकारची कलाकृती आणि हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन करण्यात आले होते. या दालनात टाकाऊपासून बनवलेल्या वस्तू देखील पाहायला मिळाल्या. त्यात काचेच्या बाटल्यावर नक्षीकाम, कागद, धातूचे तुकडे इत्यादी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या खेळणी, दागिने, सजावटीच्या वस्तू इत्यादींचा समावेश होता. या वस्तूंची रचना देखील अत्यंत सर्जनशील आणि आकर्षक आहेत. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून या कलाकारांनी नवा अर्थ निर्माण केला आहे.
ग्रामायण सेवा प्रदर्शनात मिलेट आहार प्रश्न स्पर्धतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित
नागपूर, दि. 23 डिसेंबर 2023 : आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त ग्रामायण प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मिलेट आहार प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 11 शाळांतील दीड हजार विद्यार्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत उत्कृष्ट ठरलेल्या तीन विद्यार्थाना आज दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबर रोजी ग्रामायण प्रदर्शनात बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सिंधी हिंदी हायस्कूल मुख्याध्यापिका लक्ष्मी मोझरकर यांच्या हस्ते बक्षीस मित्राचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मिलेट आहार प्रश्न मंजुषा ही स्पर्धा घेतांना सर्वच शाळांकडून छान प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश मुलांपर्यंत मिलेटचे महत्व, त्यात असलेले जीवनसत्व व त्यापासून वेगवेगळ्या पाककृती होवू शकतात हे पोहचावे हा होता. स्पर्धा दोन फेऱ्यामध्ये आयोजित करण्यात आली. एकुण ११ शाळांनी सहभाग नोंदवला. प्रश्न मंजुषा 2 भागात घेण्यात आली. पहिल्या फेरीमध्ये २० प्रश्न असलेली पर्यायवाचक प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यातुन १०० विद्यार्थी निवडण्यात आले. दुसऱ्या फेरीत निवडलेल्या १०० मुलांसाठी ऑनलाईन मल्टिल्पल चॉईस परीक्षा घेण्यात आली. त्यातील विद्यार्थी बक्षिसपात्र तीन विद्यार्थी निवडण्यात आले. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे दीड हजार रुपयाचे रोख बक्षीस सोमलवार हायस्कूल रामदासपेठची विद्यार्थिनी अक्षता निलेश तराजकर हिला देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस अनुक्रमे सोमलवार हायस्कूलचा विद्यार्थी शंतनु सुशांत बाबरे आणि टीबीआरए मुंडले स्कूल लक्ष्मीनगरची विद्यार्थिनी वेदांती मनोज तिजोडी यांना देण्यात आले. यावेळी सर्व १०० विद्यार्थी, शिक्षक आणि प्राचार्यांना प्रत्येकी १०० रुपयाचे फुड कुपन देण्यात आले. प्रत्येक शाळेला सहभाग स्मृतीचिन्ह देण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुण्या सिंधी हिंदी हायस्कूल मुख्याध्यापिका लक्ष्मी मोझरकर यांनी विद्यार्थ्यांना मिलेटचे आरोग्यदायी फायदे सांगत विद्यार्थ्यांना मिलेटचे सेवन नियमित करण्याचे आवाहन केले. जुन्या पिढीने आहार चांगला ठेवला त्यामुळे निरोगी जीवन जगत आहेत. पिझ्झा बार्कर खाणारे देश आज बाजरी, ज्वारी खाऊ लागले आहेत. त्यामुळे आज आपण देखील पाश्च्यात देशातील खाद्य संस्कृती स्वीकारण्यापेक्षा आपली ग्रामीण कडधान्य पुन्हा अंगिकारले पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे म्हणाले, पालकांनी मिलेटचे पदार्थ करून घरी करून पाहिजे. यापुढेही केवळ आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्तच नव्हे, तर नेहमी आपल्या आहारात मिलेटचे पदार्थ समाविष्ट करावेत. मिलेट हे आरोग्यदायी अन्नधान्य आहे. ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सामाजिक जाणीव विकसित होण्यासाठी आपला असा सहभाग समाजामध्ये, गटामध्ये, वर्गामध्ये आवश्यक आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिलेटचे महत्त्व आणि आरोग्यदायी फायदे याबद्दल माहिती देण्यात आली. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मिलेट आहाराबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कार्यक्रम प्रास्ताविक व संचालन माधुरी केळापुरे यांनी केले, तर आभार जयश्री आलकारी यांनी मानले.
ग्रामायण सेवा प्रदर्शनात गीत रामायण
नागपूर, दि. २४ डिसेंबर २०२३: रामनगर मैदान येथे ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामायण सेवा प्रदर्शनात शनिवारी संध्याकाळी गीत रामायणाचा कार्यक्रम पार पडला. प्रसिद्ध गायक सुधीर फडके यांचे शिष्य व संस्कार भारतीचे कार्यकर्ते नामदेव रामकृष्ण बालपांडे यांनी गीत सादर केले.
प्रसिद्ध गायक नामदेवराव बालपांडे हे मूळचे तारसा, रामटेक जिल्हा नागपूर येथील आहेत. ते या भागात मंडईत गीत रामायणाचा कार्यक्रम घेतात. त्यांनी या कार्यक्रमात रामायणातील सर्व महत्त्वाच्या प्रसंगांची गाणी सादर केली. त्यांची गाणी भावपूर्ण होती. त्यांनी आपल्या सुमधूर आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात आर्यन पुराणकर याने हार्मोनियम, तर श्रेयस नितीन जोशी तबला साथ दिली. कार्यक्रमाचे संचालन नरेंद्र गिरीधर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे यांनी नामदेवराव बालपांडे यांचे आभार मानले.
Discussion about this post