प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष पद्मविभूषण रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि रात्री उशिरा त्यांचं निधन झालं. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Ratan Tata Successor
टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा हे ७ ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. त्यासंदर्भात त्यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. मात्र मागील काही तासांत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि बुधवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाले. रतन टाटा यांचे पार्थिव दर्शनासाठी सकाळी १० ते दुपारी ३.३० या वेळेत NCPA येथे ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून ते अगदी पंतप्रधान झाल्यानंतरचा रतन टाटा यांच्या सोबतच्या भेटींच्या आठवणीला उजाळा देत दु:ख व्यक्त केलं. देशाला उद्योगक्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेणारे रतन टाटा यांच्या निधनानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त करत आदरांजली अर्पण केली आहे. देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची त्यांनी भावना व्यक्त केली.
एक ब्रँड ज्याने आपल्या देशाला जागतिक प्रतिमा मिळवून दिली आहे. खूप मोठ्या मनाची व्यक्ती आज आपल्याला सोडून गेली, ही देशाची मोठी हानी आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटा यांना आदरांजली वाहिली.
Discussion about this post