भारतीय टपाल विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून, 1 सप्टेंबर 2025 पासून नोंदणीकृत पोस्ट सेवा बंद करण्यात येणार आहे. गेल्या 171 वर्षांपासून सुरू असलेली ही पारंपरिक सेवा आता स्पीड पोस्ट सेवेमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. ब्रिटिश काळापासून, म्हणजे सुमारे 171 वर्षांपासून ही सेवा सुरू होती.
पोस्टानं आपलं कामकाज जलद, ट्रॅक करण्यास सोपं आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतला आहे. पोस्टानं सर्व सरकारी विभाग, न्यायालयं, विद्यापीठे आणि इतर संस्थांना 1 सप्टेंबरपूर्वी त्यांच्या सेवा स्पीड पोस्टवर हस्तांतरित करण्याचे निर्देश दिलेत.
पोस्टाच्या या विलीनीकरणानंतर, पोस्ट सेवा महाग होईल, ज्यामुळे सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकरी, लहान व्यापारी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी पोस्टाच्या सेवेचा खर्च वाढेल. स्पीड पोस्ट सेवेची किंमत 50 ग्रॅमपर्यंत 41 रुपयांपासून सुरू होते, तर रजिस्टर्ड पोस्ट 24.96 रुपये आणि त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त 20 ग्रॅमसाठी 5 रुपये अशी आहे. ज्यामुळे ती स्पीड पोस्टपेक्षा 20 ते 25 % स्वस्त होते.
पोस्टाच्या मते, रजिस्टर्ड पोस्टाच्या मागणीत सतत घट होत आहे. डिजिटल सेवा, ई-मेल आणि खाजगी कुरिअर कंपन्यांच्या वाढत्या वापरामुळे लोक आता पारंपारिक टपाल सेवा कमी वापरत आहेत. 1 सप्टेंबरपासून रजिस्टर्ड पोस्ट बंद केले जाणार असले तरी स्पीड पोस्टद्वारे अनेक सुविधा अजूनही उपलब्ध असतील, ज्यामध्ये ट्रॅकिंग सुविधा, फास्ट डिलिव्हरी आणि डिलिव्हरी अॅक्नॉलेजमेंट यांचा समावेश आहे.















Discussion about this post