खेळातून सुख, संस्कृती आणि मैत्रीचा संगम : छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय
एकल अभियानाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा थाटात
*नागपूर ता. २०:* देशातील आदिवासी क्षेत्रात एकल अभियानाचे मोठे योगदान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कौशल्य पुढे आणण्यासाठी काम केले. शिक्षणासोबत खेळ महत्त्वाचे असून खेळातून एकमेकांचे सुख, संस्कृती आणि मैत्रीचा संगम होतो, असे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, लॉ कॉलेज येथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या एकल अभियानाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 20 जनवरी 2024 रोजी पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एमईसीएलचे सीएमडी इन्द्र देव नारायण होते. विशेष अतिथी म्हणून विशाल अग्रवाल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू सुभाष चौधरी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री विष्णू देव साय म्हणाले, देशामध्ये दहा कोटींपेक्षा जास्त अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे. मात्र हा घटक विकासापासून वंचित होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष लक्ष देऊन पंतप्रधान जनमन योजनेच्या माध्यमातून तीन वर्षात सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय आहे. एकूण 9 मंत्रालय आणि 11 योजनांचा समावेश असलेल्या या माध्यमातून रस्ते विकास, आधार कार्ड, वीज, जल जीवन मिशन, घरगुती गॅस, आवास योजना सुरू आहेत. त्यामुळे अनुसूचित जातीचा विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मु यांची नियुक्ती करून आदिवासींचा गौरव वाढविला असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी पाहुण्यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर झालेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाचे निरीक्षण एमईसीएलचे सीएमडी इन्द्र देव नारायण यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांनी खेळाडूंना शपथ दिली, तर विशाल अग्रवाल यांनी क्रीडा मशाल स्थापित करून क्रीडा ध्वजारोहण केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
एकल अभियानाचे राष्ट्रीय संघटन प्रभारी माधवेंद्र सिंह म्हणाले, एकल अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण वनवासी मुलांना पुढे आणण्याचे काम केले जात आहे. यातूनच भारत देश भविष्यात विश्वाचे नेतृत्व करेल, असा विश्वास आहे. एकल अभियान ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना शिक्षित करण्याचे काम करीत आहे. त्याची सुरुवात झारखंड राज्यातील धनबाद येथून झाली. आज विशाल रूप निर्माण झाले असून, देशातील 31 प्रदेशात कार्य पोहोचले आहे.
यावेळी इंद्र देव नारायण म्हणाले, खेळांमध्ये हरणाऱ्याचे महत्व कमी होत नाही आणि जिंकणाऱ्यानी अहंकार ठेवू नये, असे आवाहन केले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले की, विद्यापीठाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी चांगले क्रीडांगण तयार करण्यात आले आहे. याशिवाय विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातून प्रत्येकी 25 विद्यार्थ्याची निवड करण्यात आली असून, त्यांना प्रतीमहिना पाच हजार रुपये महिना तीन वर्षापर्यंत देण्यासाठी जाहीर करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत पूर्वी पूर्वोत्तर, पश्चिम पूर्वोत्तर, दक्षिण पूर्वोत्तर, बंगाल, उडीसा, छतीसगड, उत्तर झारखंड, दक्षिण झारखंड, उत्तर बिहार, दक्षिण बिहार, पूर्वी उत्तर प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य उत्तर प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ब्रज मंडल, पंजाब, उत्तर हिमाचल, दक्षिण हिमाचल, जम्मू, कश्यप, राजस्थान, मध्य भारत, महा कौशल्य, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण तेलंगणा, उत्तर तेलंगणा, आंध्रा, कर्नाटक आदी विभातील चमू सहभागी झाल्या आहेत. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा परिचय दिपाली गाडगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रमोद अग्निहोत्री यांनी केले, तर आभार सीमा अग्रवाल यांनी मानले.
यावेळी एकल ग्राम संघटना अध्यक्षा सौ.अरुणा पुरोहित, सचिव दीपाली गाडगे, कोषाध्यक्ष बागेश महाजन, रामचंद्र माताडे, निखिल गाडगे, वनबंधू परिषदेचे अध्यक्ष दिलीप जाजू, मनिदिदी गोयंका, दत्ता फडणवीस, विभाग उपाध्यक्ष डॉ. श्रीमती रेखा आमटे, विदुला पाठक, नीलिमा पौनीकर, ममता केडिया, शकुंतला अग्रवाल, उदय दामले, सुप्रिया मंगळूरकर, शुभदा तेलंग, स्वप्ना कुलकर्णी, कविता खेमका, सीमा अग्रवाल, सुनीता खानोरकर आदी सदस्य उपस्थित होते.
*पुरस्कार वितरण समारोह 21 जानेवारीला*
एकल अभियानतर्फे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुरस्कार वितरण समारोह 21 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता नागपूर येथे होणार आहे. या समारोहाचे मुख्य अतिथी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी असतील. विशिष्ट अतिथी म्हणून वनबंधु परिषदेचे सल्लागार नंदू सारडा आणि कार्यक्रम अध्यक्ष म्हणून वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत देशभरातील बाराशेहून अधिक क्रीडापटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या क्रीडापटूंना गौरवण्यात येणार आहे.
Discussion about this post