महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत ज्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता राज्यात या निवडणुका कधी आणि किती टप्प्यांत होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगानेही नियोजन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात डिसेंबर महिन्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. सर्वात शेवटी जानेवारी 2026 मध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील, असे सांगितले जात आहे. या निवडणुका वेळेत घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला कठोर निर्देश दिले आहेत.
यापुढे निवडणुकांसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.













Discussion about this post