News34
भद्रावती : स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर ही विविध सामाजिक उपक्रम व अभियान राबवीत आहे. यात श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, अनाथाची माय स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजना, कै. म.ना. पावडे क्रिडा स्पर्धा आदी योजना सुरू आहेत.
या सोबतच यावर्षी एक नविन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे, ती म्हणजे डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना. या अंतर्गत विद्यार्थांना शिक्षणाकरीता प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांकरीता शिबीर व्याख्यानाव्दारे सुसंस्कार घडविणे, आदी विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने ट्रस्टने सदर उपक्रम सुरु केले आहे.
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक योजनेचा उपक्रम सुरू आहे. याअंतर्गत अमर बोरकर या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणाकरिता दत्तक घेण्यात आले आहे.
अमर बोरकर या विद्यार्थाचे पालक हे मुळचे चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील आहेत. मात्र मोलमजुरीकरीता भद्रावती येथे स्थाई झाले आहेत. स्थानिक जिल्हा परीषद शाळेत दहाव्या वर्गात शिकत असलेला अमर बोरकर हा हुशार विद्यार्थी आहे. आई लोकांच्या घरी धुणीभांडी करते तर वडील हे मजुरी करतात. घरची हलाकीची परिस्थीती आहे.
अमरला शिक्षणाची आवड आहे. शिक्षणासाठी अमरनी ट्रस्टकडे सहकार्य मागीतले. अमरची आवड बघून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टद्वारे स्व. सिंधुताई सपकाळ शैक्षणिक दत्तक अभियान अंतर्गत एक हात मदतीचा देत शिक्षणाकरीता दत्तक घेतले. यापुढे अमरचे सर्व शिक्षण ट्रस्ट करेल असा विश्वास ट्रस्टचे संस्थापक रविंद्र शिंदे यांनी अमरच्या पालकांना दिले.
ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सदस्या सुषमा शिंदे यांनी शिक्षणाकरीता दत्तक घेतलेल्या अमरला शालेय पुस्तके, वहया, पेन पेन्सील, शाळेचा गणवेश आदी शैक्षणिक साहित्य प्रदान केले.
यावेळी ट्रस्टचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सदस्या सुषमाताई शिंदे, दत्तक विद्यार्थ्यांचे पालक अर्चना बालाजी बोरकर व इतर मंडळी उपस्थित होते.
समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणात येत असलेल्या शालेय पाठ्यपुस्तक, शिक्षणपूरक साहित्य तथा आर्थिक अडचणी करीता ट्रस्ट सोबत संपर्क साधावा, त्यांची परिस्थिती व शिक्षणाची आवड बघून ट्रस्ट अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही ट्रस्टतर्फे यावेळी देण्यात आली.
Discussion about this post