प्रभु श्रीरामाच्या जयघोषाने कारंजा नगरी दुमदुमली, अक्षत पूजन कलश यात्रा उत्साहात निघाली
**वर्धा, कारंजा (घाडगे):** अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या मूर्ती स्थापनेच्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे अक्षत पूजन कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत 81 कलश डोक्यावर घेतलेल्या मुली सहभागी झाल्या होत्या. या कलशात अयोध्येतून आलेली अक्षत टाकण्यात आली होती. हे कलश ग्रामीण भागातील अक्षत कलश समिती सदस्यांना वितरित करण्यात आले.
येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे. याआधी संपूर्ण देशभरात अक्षत पूजन कलश यात्रा काढण्यात येत आहे. आज दि.31, रविवारी कारंज्यात ही यात्रा काढण्यात आली. या यात्रेत महिला आणि पुरुषांचा मोठा सहभाग होता. लेझीम पथक, ढोलताशा पथक, महिला भजन मंडळ या यात्रेत सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून ही यात्रा निघाली. या यात्रेला येथील ग्रामदैवत श्री संत लटारे महाराज मंदिरातून सुरुवात करण्यात आली. तर समारोप गोळीबार चौकात करण्यात आला. जय श्रीरामच्या घोषणेने परिसर दणाणून गेला होता.
या यात्रेत स्थानिक गुरुकुल पब्लिक स्कूल आणि सनशाईन स्कूलचे लेझीम पथक आणि ढोल ताशा पथक आणि कलशधारी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. समारोपीय कार्यक्रमात व्यासपीठावर चांदूरबाजार येथील हभप श्याम महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक सुनील कडू आणि अक्षत कलश यात्रा समितीचे सहसंयोजक जयंत टावरी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर श्याम महाराज यांनी उदबोधन केले. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि परिचय जयंत टावरी यांनी तर संचालन प्रेम महिले यांनी केले.
Discussion about this post