News34
चंद्रपूर – राज्यात मागील काही आठवड्यांपासून डोळ्यांची साथ सुरू असून, ही साथ आता काहीशी तीव्र झाल्याचे दिसून येत असल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी, काळजी घेण्याचं आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.
पावसाळ्यात जे संसर्गजन्य आजार फोफावतात, त्यामध्ये डोळे येणे ( व्हायरल कन्जक्टिव्हायटिस ) हा प्रमुख आजार आहे.हा आजार खूप गंभीर स्वरुपाचा समजला जात नसला तरी संसर्गजन्य असल्याने व डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर त्याचा परिणाम होऊन बरा व्हायला बराच कालावधी लागतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा आजार सर्वत्र आढळत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे.
डोळे आले असतील, अशा वेळी डोळ्यांना सतत हात लावू नये. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धूत राहावे. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा. कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे/सुरक्षित अंतर राखून राहावे. कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ज्ञांचा/नेत्र रोग तज्ञांचा सल्ला घ्यावा. योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर ५ ते ६ दिवसांत डोळे बरे होतात. डोळे आल्यास शालेय विद्यार्थ्यांनी शक्यतो दोन-तीन दिवस शाळेत जाऊ नये.
डोळ्यातून पाणी किंवा स्त्राव येणे, डोळे लाल होणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणं आहेत. डोळे येण्याचा संसर्ग सामान्यत: प्रथम एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेले की पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही असं म्हटलं जातं, पण त्यात तथ्य नाही. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी, काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
सामान्य लक्षणे –
१. डोळा लाल होणे, सूज येणे आणि खाज सुटणे. डोळ्यातून सतत पाणी येणे.
२. चिकटपणा जाणवणे
३. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुबळ्यांमध्ये दाह जाणवून येणे.
४. डोळ्यातुन पिवळा द्रव बाहेर येणे
५. डोळ्यात टोचल्यासारखे, खुपल्यासारखे वाटणे.
काय काळजी घ्याल –
१. डोळ्यांना सतत स्वच्छ पाण्याने धुवा
२. रुग्णाच्या संपर्कात आल्यास हात वारंवार धुवा ,कारण डोळ्यातून निघालेल्या स्त्रावा सोबत संपर्क आल्यास हा आजार झपाट्याने पसरतो
३. रुग्णाचे दैनंदिन वापराच्या गोष्टी जसे टॉवेल,चादर,उशी ,हातरुमाल रोज धुवा व वेगळे ठेवा.
४. रुग्णांनी शाळेत व सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये
५. हा आजार डोळ्यात बघण्यांनी होत नाही,परंतु गॉगल लावावा त्यामुळे डोळ्याना वारंवार स्पर्श होणार नाही व त्यामुळे प्रसार थांबेल
६. संसर्ग झाल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांना दाखवा व त्यांच्या सल्याशिवाय कुठलाही औषधोपचार करू नका ते घातक होऊ शकते
गैरसमज – असे मानले जाते की डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे बघितल्याने आपलेही डोळे येऊ शकतात, हा गैरसमज आहे. निव्वळ बघितल्याने आजार पसरत नाही.
Discussion about this post