News34 chandrapur
चंद्रपूर – माझी वसुंधरा अभियानांतर्गत वायू प्रदूषणावर उपाययोजना म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असुन ई-वाहन खरेदी करण्यास इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांना १ लक्ष रुपये अग्रिम राशी दिली जाणार आहे.
चंद्रपूर शहर हे मोठ्या प्रमाणात प्रदुषित शहरांपैकी एक गणले जाते. प्रदूषणास इतर घटकांबरोबरच पेट्रोल व डिझेल वाहनांची वर्दळही कारणीभुत आहे. त्यामुळे ई-वाहनांचा वापर वाढणे व पेट्रोल- डिझेलचा वापर कमी होणे गरजेचे आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण हा महत्चाचा घटक आहे. ई-वाहनांच्या वापरास प्रोत्साहन दिल्यामुळे पंचतत्वातील वायु या घटकाचे संवर्धन होणार आहे. याच तत्वावर काम करत चंद्रपूर महानगरपालिकेने हे सकारात्मक पाऊल उचलले आहे.
याअंतर्गत ई-वाहन खरेदी करण्यास इच्छुक अधिकारी कर्मचाऱ्यांना १ लक्ष रुपये अग्रिम राशी दिली जाणार असुन अग्रिम राशीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातुन दर महिन्याला कपात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार २७ जून रोजी झालेल्या प्रशासकीय बैठकीत सदर ठराव मंजूर करण्यात आला असुन पर्यावरणपुरक उपाययोजना अंतर्गत मनपातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Discussion about this post