घुग्गुस शहरातील १९९ छोट्या व्यावसायिकांनी घेतला पी. एम स्वनिधी च्या पहिल्या कर्जाचा लाभ
घुग्गुस नगरपरिषद अंतर्गत सप्टेंबर २०२३ पासून अंमलबाजवणी करण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेचा ( पीएम स्वनिधी योजना ) शहरातील १९९ छोट्या व्यावसायिकांनी आत्तापर्यंत पहिल्या कर्जाचा लाभ घेतला आहे.
पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना सुरू करण्यात आली आहे.योजनेअंतर्गत पथविक्रेत्यांना व्यवसायाकरीता एका वर्षासाठी विनातारण कर्ज रु. १०,०००/- राष्ट्रीयकृत बँक मार्फत देण्यात येते. शहरातील राष्ट्रीयकृत बँक या पथविक्रेत्यांनी केलेल्या अर्जाची छाननी करतात व विहीत मुदतीत अर्ज निकाली काढुन प्रकरणे मंजुर करण्याची प्रक्रिया करतात. पहिले कर्जाची परतफेड झाली की दुसरे कर्ज रु. २०,००० /- अठरा महिने करिता तसेच दुसरे कर्ज परतफेड झाली की रु. ५०,०००/- ३ वर्ष करिता दिले जाते.
घुग्गुस नगरपरिषद अंतर्गत ही योजना कार्यान्वित असून या योजनेच्या लाभाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असुन अधिक माहीतीसाठी नगरपरिषद कार्यालय, येथे संपर्क साधावे.तसेच शहरातील जास्तीत जास्त छोट्या व्यावसायिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व कर्ज मुदतीत परतफेड करावे असे आवाहन घुग्गुस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. श्री जितेंद्र गादेवार यांनी केले आहे.
Discussion about this post