संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध :
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी दाभणा येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडुन दुर्देवी अंत झाला. ही दुःखद घटना आज दि.२ फेब्रुवारी रोज रविवारला दुपारी ३.३० ते ४.००वाजेच्या दरम्यान उघडकिस आली.मृतकांची नावे रितीक रुपराम पातोडे वय 13 वर्ष, दुर्गेश धनंजय पातोडे वय 13 वर्षे रा.अरततोंडी अशी आहेत. पातोडे कुटुंबीयांवर दुःखांचा डोंगर कोसळला.तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अरततोंडी दाभणा येथील रितीक रुपराम पातोडे,व दुर्गेश धनंजय पातोडे हे दोन्ही चुलत भाऊ असुन 13 वर्ष वयाचे होते. गावातीलच जि.प.शाळेत इयत्ता ७ वी मध्ये एकाच वर्गात शिकत होते.आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मौजमस्ती व खेळण्यामधे दंग होते.अशातच त्यांनी पिंपळगाव- अरततोंडी मार्गावर अगदी अरततोंडी गावाला लागुनच असलेल्या तलावात 2 फेब्रुवारीला सकाळी १०.०० ते ११.०० वाजेच्या दरम्यान लहान लहान गोरे ( बैल ) धुवायला दोन्ही मुलं गेली होती.तलावात पाणी भरपुर असल्याने खोल पाण्यात गेले.त्यांना पोहता येत नसल्याने दोघांचाही पाण्यात बुडुन दुर्देवी मृत्यु झाला. मात्र ही दुर्दैवी घटना दुपारी ३.०० ते ४.०० वाजेच्या दरम्यान लक्षात आल्याने गावांत एकच खळबळ माजली.गावात या दुर्दैवी घटनेची माहिती वा-यासारखी पोहचताच तलावावर गावक-यांनी एकच तोबा गर्दी केली.गावक-यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाहताच आईवडील व नातेवाईक व ग्रामवासियांनी एकच हंबरडा फोडला. राजहंस आमुचे निजले छाती बडवून आयांनी एकच आक्रोश केला.
दोन्ही मुलं आपल्या आई-वडील यांना एकुलते एक असल्याने पातोडे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा आघात झाला आहे.मृतक दोन्ही मुलं आपल्या शाळेत अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणुन त्यांची ओळख होती.त्यांचा नुकताच संपन्न झालेल्या २६ जानेवारी ला प्रजासत्ताक दिनी शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थी म्हणुन सत्कारही झाला होता. हे येथे उल्लेखनीय आहे. अशा या दोन्ही मुलांच्या अकाली व दुर्दैवी मृत्यूमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.
दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.अर्जुनी मोरगाव पोलिसांनी मार्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Discussion about this post