लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा
70 वर्षांवरील वृद्धांसाठी ₹ 5 लाखांपर्यंत मोफत उपचार
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने रविवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. याला मोदींची गॅरंटी असे नाव देण्यात आले आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर नेते उपस्थित आहेत. पंतप्रधानांनी विविध वर्ग आणि विभागातील लोकांना मंचावर बोलावून संकल्प पत्राची पहिली प्रत दिली. हे तेच लोक आहेत ज्यांना मोदी सरकारच्या आधीच्या काही योजनेचा लाभ मिळाला होता. यासोबतच गेल्या 10 वर्षातील आश्वासने आणि त्यांची पूर्तता यावर केलेला व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला.
आरक्षण न दिल्यास मराठा समाज विधानसभेची तयारी करणार
5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार
5 जूनपर्यंत ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर मराठा समाज विधानसभेची तयारी करणार. तसेच 5 जून पासून पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार अशी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. महायुती सरकारने मराठा समाजाला फसवण्याचे काम केले असे आरोप पुन्हा एकदा जरांगे यांनी केले आहेत. प्रसार माध्यमांशी बोलतांना त्यानी यंदाची निवडणूक समाजाच्या हाती असल्याचे म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार
लहान मुलाचा वापर केल्याचा आरोप
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. राजकीय फायदा उचलण्यासाठी आणि निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी लहान मुलाचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अंधारे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांनी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांच्यावर आरोप करताना त्यांच्या सून पूजा तडस यांच्याबरोबरच त्यांच्या 17 महिन्याच्या मुलाला व्यासपीठावर आणले होते. या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार
पोलिसांनी वाढवली सुरक्षा
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ४.५५ वाजता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर घडली.दोन अज्ञांताकडून चार राऊंड फायर केल्याचे म्हटले जात आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली असून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे. दरम्यान, याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.
चंद्रपुरात माता महाकालीच्या यात्रेस प्रारंभ
महिनाभर चालणार यात्रा महोत्सव
राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता महाकालीच्या यात्रा महोत्सवाला आज (दि 14 एप्रिल) पासून चंद्रपुरात प्रारंभ होत आहे. महिनाभर ही यात्रा भरणार असून राज्यभरातील भाविक माता महाकालीचे दर्शन घेणारं आहेत. राज्यभरातील भाविक महिनाभराच्या कालावधीतील महाकाली यात्रा महोत्सवास मातेचे दर्शन घेणार असल्याने यात्रा महोत्सवात भाविकांची गर्दी वाढणार आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था तसेच रहदारीस अडथळा निर्माण होवु नये याकरिता १४ एप्रिल ते २३ एप्रिल २०२४ पर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
Discussion about this post