ग्रामायण सेवा प्रदर्शन 22 रोजी उदघाटन
पहिल्या दिवशी सामाजिक संस्थेची माहिती व समाजकार्य महाविद्यालयांच्या अपेक्षा यावर संवाद
आगळेवेगळे खाद्य दालन, आर्टिझन गॅलरी, सेवा दालन राहणार
नागपूर, (प्रतिनिधी) : ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने आणि नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित पाचवे विदर्भातील वैशिष्टपूर्ण ग्रामायण सेवा प्रदर्शन 2023, येत्या 22 ते 26 डिसेंबर या काळात रामनगर मैदान रामनगर येथे आयोजित आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन 22 तारखेला दुपारी तीन वाजता होईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक श्री. राजेशजी लोया आणि वर्धा येथील सुप्रसिद्ध सर्वोदय कार्यकर्त्या श्रीमती डॉ. विभा गुप्ता (अध्यक्ष – मगन संग्रहालय समिती, वर्धा संस्थापक आणि संचालक ग्रामोपयोगी विज्ञान केंद्र, वर्धा) उपस्थित राहणार आहेत.
हे भव्य आगळे वेगळे प्रदर्शन राहणार असून, अन्नपूर्णा खाद्य दालन, भारतीय पारंपरिक कारागीर व कलाकार यांच्यासाठी आर्टिझन गॅलरी, सेवा संस्था / एनजीओ, छोटे उद्योजक स्टार्टअप, शेतकरी, महिला, यांच्याकरिता सेवा दालन, स्वतंत्र राहणार आहे. सेवा प्रदर्शनात ग्रामीण भागातील तसेच स्वनिर्मित उद्योजकांना प्रथम संधी दिली जाते. 20 ते 25 हजारावर ग्राहक प्रदर्शनाला भेट देतात. चोखंदळ ग्राहक आणि भक्कम विक्री हे ग्रामायण सेवा प्रदर्शनाचे एक वैशिष्ट्य आहे. पाच दिवस भरगच्च कार्यक्रम असतील.यात जुगाडू इंजिनियर्स स्पर्धा, महिला मंडळ स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक समाज योद्धा स्पर्धा, सुवर्ण महोत्सवी जोडप्यांचा सत्कार, अशा स्पर्धा घेण्यात येतील. प्रदर्शनाच्या ठिकाणी सर्व प्रकारचे वेस्ट कलेक्शन करण्यात येणार आहे. सुमारे 140 स्टॉल यावर्षी प्रदर्शनात राहणार आहेत.
पहिल्या दिवशी दि. 22 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजता सेवा संस्था व समाजकार्य महाविद्यालय सेवा संस्था (NGO), प्रतिनिधी आणि समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य/प्रतिनिधी यांच्यासाठी संवाद सत्र होणार आहे. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, सहयोग क्लस्टर, नागपूर यांच्या सयुक्त सहकार्याने हे संवाद सत्र होत आहे. यात नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांचा उत्साह वाढवावा असे, आवाहन ग्रामायण प्रतिष्ठानने केले आहे.
Discussion about this post