नागपूर, दि. 5 : शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणारे काही रुग्ण मुळातच वैद्यकीयदृष्ट्या अत्यवस्थ व गंभीर स्वरूपाचे असतात. त्यामुळे दिवसाला सरासरी आठ रुग्णांचा मृत्यू होतो. दररोज दाखल होणाऱ्या सरासरी हजारावर रुग्णांमध्ये ही मृत्यू संख्या आहे. शासन गुणात्मक रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, नागपूरची वैद्यकीय व्यवस्था गरीब, गरजू आणि अत्यवस्थ रुग्णांसाठी तत्पर असल्याची ग्वाही, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये (मेडिकल) आज प्रशासनामार्फत पत्रकार परिषद घेण्यात आली. नागपूर हे मध्यभारतातील रुग्णांसाठी महत्त्वाचे उपचार केंद्र असून गोरगरिबांना अफवांमुळे वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी. माध्यमांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती द्यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) व इंदिरा गांधी वैयकीय महाविद्यालया (आयजीएमसी) विषयी रुग्णांमध्ये विश्वासार्हता कायम ठेवावी, असे आवाहन आज जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करतांना अत्यवस्थ असणाऱ्या रुग्णांचेच मृत्यू झाले आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील तीन महिने पुरेल इतका औषधांचा साठा असून उत्तम सुविधा आहेत.मनुष्यबळाची जी काही कमतरता असेल ती येत्या दोन महिन्यात वर्ग-३ व ४ कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतून पूर्ण करण्यात येईल अशी माहिती, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी दिली.
जीएमसी मधील रुग्णांच्या मृत्यूबाबतचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसृत झाले यावर स्पष्टीकरण देताना डॉ. इटनकर म्हणाले, बुधवार दि. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी जीएमसीमध्ये एकूण १२ रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. यातील ११ रुग्ण दाखल करतानाच हे आयसीयुमध्ये घ्यावे लागले. एकजण जनरलवार्ड मध्ये दाखल होता. जीएमसीमध्ये दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांची सरासरी संख्या १ हजार एवढी असून बहुतांश रुग्ण हे गंभीर आजारी किंवा अपघात ग्रस्त असतात. यातील सरासरी आठ ते दहा अत्यवस्थ रुग्णांचा दररोज मृत्यू होतो. त्यांनी यावेळी जानेवारी ते सप्टेंबर २०२३ पर्यंत जीएमसीमध्ये दाखल, बरे झालेले आणि मृत्यू झालेले रुग्ण यांच्यासह बेडची उपलब्धता आदी सुविधांची माहिती दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस स्थितीवर लक्ष ठेवून असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक सुविधा व अधिकारी-कर्मच्याऱ्यांची भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याचे निर्देश त्यांनी दिल्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले.
त्यानुसार 233 परिचारिकांची (नर्स) भरती अंतिम टप्प्यात असून येत्या दोन महिन्यात वर्ग- ४ च्या 511 रिक्त पदांसह वर्ग-3 चे रिक्त पदे भरण्यात येतील. जीएमसीला आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला प्रत्येकी १३ कोटी आणि आयजीएमसीकरिता जिल्हा वार्षिक योजनेमधून ८ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. तर जिएमसी, आयजीएमसी या दोन्हीच्या बळकटीकरणासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एकूण ८०० कोटींची तरतूद केली आहे. पुढील ३ महिने पुरेल एवढा औषधसाठा उपलब्ध असल्याचे डॉ. इटनकर यांनी सांगितले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून यावर्षी या रुग्णाच्या अपडेशनसाठी शासनाने ५०० कोटी मंजूर केले आहे. तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयासाठी देखील ३०० कोटी मंजूर करण्यात आले आहे. आपण स्वतः डॉक्टर असून दोन्ही मोठ्या वैद्यकीय संस्थांमधील रुग्णसेवा अविरत दर्जेदार राहील याकडे जातीने लक्ष ठेवून असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गेली 75 वर्ष अहोरात्र या रुग्णालयांची रुग्ण सेवा गरिबांसाठी सुरू असून कोणत्याही अफवांना बळी न पडता नागरिकांनी रुग्णसेवेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
Government Medical College and Hospital, Nagpur
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, नागपूर
आय.पी.डी. पेशंट डाटा
महिना | नोंद झालेले मासिक रूग्ण | उपचारार्थ दाखल आंतररुग्ण | बरे झालेले रुग्ण | मृत्यू | एकूण रूग्ण | दररोजचे सरासरी रूग्ण | एकूण बेड | मुक्कामाचा कालावधी | सरासरी मृत्यू
|
जाने.23 | 32509 | 4508 | 2347 | 395 | 29767 | 960 | 74.85 | 11.86 | 9.7 |
फेब्रु. 23 | 30942 | 4109 | 2950 | 390 | 27602 | 986 | 71.24 | 9.26 | 8.8 |
मार्च 23 | 29170 | 4650 | 2923 | 325 | 25922 | 836 | 67.16 | 8.98 | 7.6 |
एप्रिल 23 | 29805 | 4271 | 2910 | 368 | 26527 | 884 | 68.63 | 9.09 | 8.7 |
मे 23 | 31651 | 4533 | 2993 | 453 | 28205 | 910 | 72.88 | 9.18 | 9.9 |
जून 23 | 32982 | 4464 | 3221 | 372 | 29389 | 980 | 75.94 | 9.18 | 8.3 |
जुलै 23 | 34648 | 4831 | 4175 | 322 | 30151 | 973 | 79.78 | 7.70 | 8.1 |
ऑगस्ट 23 | 36835 | 5693 | 4560 | 452 | 31823 | 1027 | 84.81 | 7.35 | 11.3 |
सप्टें.23 | 37215 | 5806 | 4653 | 440 | 32122 | 1071 | 85.69 | 7.31 | 7.5 |
एकूण | 295757 | 42865 | 30732 | 3517 | 261508 | 8626 | 680.98 | 79.92 | 79.9 |
दैनिक सरासरी | 1095 | 159 | 114 | 13.0 | 969 | 958 | 75.66 | 8.88 | 8.88 |
Discussion about this post