संजीव बडोले, प्रतिनिधी | नवेगावबांध, दि. ९ मे
भुरशीटोला येथील २६ वर्षीय युवक पुरुषोत्तम लक्ष्मण हेमने याचे आज सकाळी दुखद निधन झाले. २ मे रोजी झालेल्या गंभीर रस्ते अपघातानंतर सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याने आज (९ मे) सकाळी ११ वाजता प्राण सोडले. त्यांच्या निधनामुळे भुरशीटोला गावात शोककळा पसरली आहे.
पुरुषोत्तम हा २ मे रोजी बौधनगर (ता. सडकअर्जुनी) येथे आपल्या मावशीकडे जात असताना, भंडारा जिल्ह्यातील सालई-गोंडउमरी रस्त्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास समोरून येणाऱ्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
त्याच्यावर गोंदिया येथील बजाज रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. आज सायंकाळी त्याच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गावकऱ्यांनी पुरुषोत्तमच्या दुःखद निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
Discussion about this post