चंद्रपूर ३१ जानेवारी – मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात दुर्लक्ष केल्याने सर्वेक्षण प्रगणक सुनील माळवे यांना निलंबित करण्यात आले असुन सदर सर्वेक्षण हे महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत व काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण २३ जानेवारी पासुन केले जात आहे. या कामात चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४९ पर्यवेक्षक व ७३९ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षण सुद्धा देण्यात आले.मात्र प्रगणक म्हणुन जबाबदारी देण्यात आलेले सुनील माळवे यांनी प्रशिक्षण पुर्ण करून सुद्धा काम स्वीकारले नाही.अनेकवेळा सुचना देऊन देखील काम सुरु न केल्याने त्यांच्यावर निलंबनाची सक्त कारवाई करण्यात आली.
सर्वेक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असुन आतापर्यंत ५६ हजार २४६ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सर्वेक्षणाची माहिती ध्वनी यंत्रणा,वृत्तपत्रे,समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली आहे. आता सर्वेक्षणास २ दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठल्याही स्वरूपाची हयगय खपवुन घेतली जाणार नसल्याचे चंद्रपूर मनपा आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post