नवेगावबांध येथे उद्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५० जोडप्यांचा सत्कार.
लाडक्या बहिणींचा होणार साडीचोळी देऊन सन्मान.
लावणी सम्राज्ञ मयुरी मुंबईकर यांच्या मराठमोळ्या लावण्या.
सार्वजनिक गाव उत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम.
संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.९.
नेहमीच गावात आगळे वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत ख्याती असलेल्या, येथील सार्वजनिक गाव उत्सव समिती नवेगावबांधच्या वतीने रक्षाबंधना निमित्ताने उद्या दि.१० ऑगस्ट रोज रविवारला सायंकाळी ७.३० वाजता आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.यात उभयतांच्या सत्कारा बरोबरच,लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाची भेट म्हणून साडीचोळी भेट देण्यात येणार आहे.
या आगळ्यावेगळ्या,नाविन्यपूर्ण कार्यक्रमात गावातील आंतरजातीय विवाह करणाऱ्या ५० जोडप्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
आमचा हा उपक्रम म्हणजे समाजामध्ये समता निर्माण व्हावी, सामाजिक भेदभावाच्या सर्व भिंती गळून पडाव्यात व समतेवर आधारलेल्या समाजाचे निर्मितीसाठी केलेला छोटासा प्रयत्न आहे.अशी माहिती समितीचे प्रवीण डोये यांनी दिली आहे.
या समारंभाचे उद्घाटक अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले हे असून,गोंदिया जिल्हा शिवसेनाप्रमुख शैलेश जयस्वाल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.
पाहुणे म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य रचना ताई गहाणे,उद्योगपती नितीन पुगलिया, सरपंच हिराताई पंधरे, विजयसिंह भरत सिंह ठाकुर, सुनील तरोणे उपस्थित राहणार आहेत.
१० ऑगस्ट रोज रविवारला रक्षाबंधनाच्या सणाचे औचित्य साधून रात्री ८.०० वाजता येथील ग्रामपंचायत समोरील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या भव्य पटांगणावर लाडक्या बहिणींसाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी सुपरफास्ट डान्सिंग क्वीन,लावणी सम्राज्ञी मयुरी मुंबईकर यांच्या ग्रुपचा पारिवारिक व मराठमोळ्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ८.०० वाजता होणाऱ्या मराठमोळ्या लावण्यांच्या बहारदार कार्यक्रमासाठी मुंबई वरून येणाऱ्या मयुरी मुंबईकर आणि कलाकारांची भव्य शोभायात्रा दुपारी तीन वाजता येथील इंदिरानगर ते बस स्टॅन्ड पर्यत मुख्य रस्त्यावरून काढण्यात येणार आहे.
आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी समितीकडे नोंदणी करावी,तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करावे.असे आवाहन समितीचे अध्यक्ष तुकाराम मेश्राम,उपाध्यक्ष संजय भुमके,सचिव प्रवीण डोये,विलीन बडोले,गौरव चौधरी ,अशोक भुमके,दिलीप पोवळे,अशोक परशुरामकर,सचिन सांगोळकर यांनी केले आहे.













Discussion about this post