अर्जुनीमोर तालुक्यात येरंडी येथे आढळला ‘जीबीएस’चा संशयीत रुग्ण.
१८ दिवसांपासून एम्स रुग्णालयात घेत आहे उपचार.
आरोग्य यंत्रणा मात्र उदासीन
संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.५.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात येथून नजीक असलेल्या येरंडी देवलगाव या गावात एक जीबीएस (गुलियन बेरी सिंड्रोम) चा संशयीत रुग्ण आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग मात्र याबाबतीत उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
१४ वर्षीय मुलाला या आजाराची लागण झाली आहे.त्याचे वर नागपूर येथील एम्स रुग्णालयात मुलांच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहे.
तो गेल्या १८ दिवसापासून व्हेंटिलिटरवर आहे. गोंदिया जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण असावा. पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना या गावात या रोगाने ग्रस्त एक मुलगी सापडली आहे.त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील हा मुलगा.
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुलियन बेरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने डोके वर काढले आहे. याचे लोन आता गोंदिया जिल्ह्यातही पोहोचले आहे. अज्ञात व्हायरस शरीरात घुसून थेट रक्तवाहिनी स्नायूवर हल्ला करत असल्याने हातापायावरील ताकद जाऊन अंगलुळे पडण्याची लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येतात.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी देवलागाव येथील १४ वर्षीय मुलगा अर्जुनी मोर येथील जी एम बी विद्यालय येथे आठव्या वर्गात शिकत आहे. हे येथे उल्लेखनीय आहे.
त्याची प्रकृती १७ जानेवारी २०२५ ला अचानक बिघडली. लगेच सदर मुलाला ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे १८ जानेवारीला दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच दिवशी सांय. सहा वाजता गोंदिया जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथेही प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याच दिवशी रात्री एक वाजता नागपूरला हलविण्यात आले. एका खाजगी दवाखान्यात भरती केल्यानंतर तिथे एम आर वगैरे काढण्यात आले. व यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर रक्त तपासणी नसाचे स्कॅनिंग कमरेतील पाण्याचे रिपोर्ट घेऊन तपासणी केली असता सदर मुलाला जीबीएस चे लक्षण दिसून आल्याचे समजते. त्यामुळे एम्स रुग्णालयातील मुलांच्या अतिदक्षता विभाग मध्ये भरती करण्यात आले. गेल्या १८ दिवसापासून एम्स रुग्णालयात सदर मुलाला व्हेंटिलेटर वर ठेवून उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
संसर्गजन्य रोग नाही, नागरिकांनी घाबरून नये.
सदर मुलाच्या आजाराविषयी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर. येथुन माहीती मिळाली असुन सदर मुलाला गिळण्याचा त्रास व श्वासाचा त्रास, तसेच दोन्ही पायात हालचाल नव्हती. त्यामुळे गोंदिया केटिएस ला हलविण्यात आले. तिथुनमुखचला नागपुर एम्स मधे दाखल केले. त्याला जीबीएस ची लागन झाल्याची अधिकृत माहीती प्राप्त झाली नाही. जिल्हा आरोग्य विभाग एम्स रुग्णालयाचे संपर्कात असुन अधिकृत माहीती आल्याबरोबर सदर गावाचे तातडीने सर्व्ह करुन ग्रामवासियांची तपासण्या करु, जीबीएस हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरीकांनी घाबरु नये.
-डॉ. सुकन्या कांबळे
तालुका वैद्यकीय अधिकारी अर्जुनी-मोर.
थकवा, हातपायाला मुंग्या
• साधारण ७८ हजार लोकांमध्ये एकाला हा सिंड्रोम होतो. तो का होतो, याची सगळी कारणे अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. पण चहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा जिवाणूच्या संसर्गानंतर त्याची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे मळमळणं, उलट्या, जुलाब होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो. थकवा, हातापायाला मुंग्या येणे, झिणझिण्या येणे ही याची लक्षणे असू शकतं. पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणे हात, चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
Discussion about this post