छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी अत्यंत उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाने ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीला उजाळा देत उपस्थित सर्वांना प्रेरणादायी अनुभव दिला.
कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रा (पालखी) आणि पारंपरिक लेझीम प्रदर्शनाने झाली. विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात शोभायात्रेने उत्साही वातावरण निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक भक्तिमय वातावरणात पार पडला, जिथे पार्श्वभूमीवर शिवस्तुती गायली गेली. त्यानंतर शिवगर्जना करत भव्य फ्लेक्स उलगडण्यात आला.

या प्रसंगी *प्रमुख पाहुणे श्री. आदित्य लोहे आणि मान्यवर अतिथी श्री. दीपक अग्रवाल (डीएसपी, बुटीबोरी विभाग)* उपस्थित होते. पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गोंधळ सादरीकरण करून पारंपरिक लोककलेला उजाळा दिला. यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देण्यात आली व त्यांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वगुणांवर विचार मांडले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर करून त्यांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात सोहळ्याचा पहिला टप्पा संपन्न झाला. आभार प्रदर्शन डॉ. कल्पित कौरासे यांनी केले.
*प्रेरणादायी व्याख्यान*
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते आणि अभिनेता श्री. आदित्य लोहे यांनी *”युद्धापलीकडले छत्रपती शिवराय”* या विषयावर सखोल व्याख्यान दिले. या व्याख्यानात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी, माणसे जोडण्याची कला आणि उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्य यावर प्रकाश टाकला.
ते म्हणाले की शिवराय केवळ योद्धे नव्हते, तर एक उत्कृष्ट प्रशासक, दूरदर्शी नेते आणि समाजसुधारक होते. त्यांनी कृषी सुधारणा, जलव्यवस्थापन आणि नैतिक प्रशासन यावर विशेष भर दिला. त्यांच्या राजवटीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत, सिंचनासाठी जलसंधारणाचे नियोजन आणि करसवलती देण्यात आल्या. त्यांनी प्रशासनात नैतिकता आणि न्यायप्रियता यावर भर दिला, त्यामुळे त्यांचे राज्य सर्व समाजघटकांसाठी सुरक्षित आणि समृद्ध झाले.
शिवरायांनी समाजातील विविध स्तरांतील लोकांना एकत्र आणून सहकार्याने स्वराज्य स्थापन केले. त्यांनी फक्त सैन्यबळावर नव्हे, तर उत्तम प्रशासन आणि लोकसहभागाच्या आधारे राज्यकारभार केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच मराठा साम्राज्याने पुढील अनेक दशके टिकून राहिले.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड पाटील, उपाध्यक्ष श्री. आकाश गायकवाड पाटील, कोषाध्यक्ष डॉ. संदीप गायकवाड, प्राचार्य डॉ. पी. एल. नाकतोडे, उप-प्राचार्या डॉ. प्रगती पाटील, अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समिती आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. संपूर्ण सोहळा उत्साही, प्रेरणादायी आणि दैदिप्यमान असा पार पडला.
Discussion about this post