Unveiling of the Guinness World Records Pillar Monument
अमरावती :- भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात अकोला- अमरावती महामार्ग निर्मितीचा गिनीज विश्व विक्रम देशाला समर्पित आहे, असे मनोगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी यांनी केले. ते बडनेरा वाय पॉइंट येथे राजपथने उभारलेल्या गिनीज विश्वविक्रम स्तंभ स्मारकाच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.
ते म्हणाले की, हा विक्रम अमरावती-अकोला जिल्ह्यात नोंदवला जाणे हे विशेष आनंददायी आहे. या विक्रमाचे प्रतिक म्हणून उभारलेले सुरेख स्तंभ स्मारक या विक्रमाची ग्वाही देत आहे. तर बाजूला असलेल्या उड्डाणपुलावर देखील देशाचा गौरव वाढविणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची चित्रे काढलेली त्यामुळे आसपासच्या परिसरातील बळगोपलांना हे स्थळ सहलीसाठी उत्तम ठरेल याचा आनंद आहे. आता या महामार्गामुळे अमरावती – अकोला हे अंतर केवळ ५० मिनिटांत पार करता येणे शक्य आहे, असेही गडकरी यांनी सांगितले. या विश्वविक्रमी कार्याकरीता राजपथचे सीएमडी जगदीश कदम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि सर्व सहभागी व्यक्तींचे त्यांनी अभिनंदन केले.
दिनांक २३ नोव्हेंबर रोजी अमरावती-अकोला महामार्गावरील ‘बडनेरा वाय पॉइंट’ येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभ हस्ते या श्रमसाधनेच्या स्मारकाचे लोकार्पण झाले. या कार्यक्रमाच्या वेळी सौ. कांचन जी गडकरी, खा. अनिल बोंडे, खा. नवनीत राणा, आ. प्रवीण पोटे पाटील, आ. प्रताप अडसड, आ. सुलभा खोडके, वसंतदादा खंडेलवाल, महापालिका आयुक्त, भाजपा नेते किरणभाऊ पातुरकर, दीलीपजी शिरूर, जयंतराव डेहनकर राजपथचे सीएमडी जगदीश कदम, सौ. मोहना कदम,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ह महामार्ग निर्मिती आणि गिनीज विश्व विक्रम यांवर आधारित कॉफी टेबल बुकचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकाळात प्रगतीची नवी वाटचाल करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रयत्न केले जात आहेत. या उद्देशाने राजपथ इन्फ्राकॉन नव्या संकल्पना आणि नवी उमेद घेऊन काम करत आहे. देशांत रस्ते बांधणी पायाभूत सुविधा क्षेत्रांत गिनीज विश्व विक्रमावर आपले नाव कोरणारी राजपथ इन्फ्राकॉन ही एकमेव खासगी कंपनी आहे. या विश्वविक्रमाची आठवण म्हणून एक स्तंभ उभारण्यात आला आहे.
या गिनीज विश्व विक्रमाची कायमस्वरुपी आठवण राहावी या उद्देशाने हे स्तंभ स्मारक उभारण्यात आले आहे. ‘श्रम हीच प्रतिष्ठा’ हे धोरण अंगीकारुन हे देशकार्य करताना शेकडो हात कामाला लागले. या कार्याच्या यशस्वीतेसाठी चिकाटीने व समर्पित भावनेने प्रयत्न करणाऱ्या सर्व ७२८ कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या स्तंभ स्मारकावर सर्व कामगारांचे नाव कोरण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अमरावती ते अकोला यादरम्यान ७५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या महामार्गाचे बिट्युमिनस काँक्रीटकरणाचे काम टप्पा-१ आणि टप्पा-२ मध्ये केले आहे.
दिनांक ३ जून २०२२ रोजी सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी सुरु झालेले हे काम ७ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५ वाजता संपले. तब्बल १०५ तास ३३ मिनिटे सातत्याने काम करत राजपथने गिनीज विश्व विक्रमावर आपले नाव कोरले.
श्री जगदीश कदम – सीएमडी, राजपथ इन्फ्राकॉन यांचे मनोगत
राजपथ गिनीज विश्व विक्रम स्तंभ स्मारक अनावरणाच्या कार्यक्रमात आमच्या विनंतीला मान देऊन आवर्जून आल्याबद्दल केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी यांचे मी आभार मानतो. देशाच्या इतिहासात पायाभूत सुविधा निर्मिती क्षेत्रात प्रथमच असा विश्वविक्रम नोंदवला गेला आणि आम्ही याचा भाग होतो याचा मला अभिमान वाटतो.
हे यश साजरे करताना, अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, कौतुकाचे गीत गायले जात असताना या कामासाठी अविरत कष्टलेल्या करणाऱ्या शेकडो हातांप्रती मी कृतज्ञ आहे. त्यांचा उल्लेख करणे, त्यांनी गाळलेल्या घामाची पोचपावती देणे हे मी माझे कर्तव्य समजतो आज, मी फक्त राजपथ इन्फ्राकॉनचा प्रमुख म्हणून नाही तर कष्ट, दृढनिश्चय आणि आमच्या क्षमतांवर अतूट विश्वासाने विणलेल्या सामूहिक स्वप्नांचा नम्र कारभारी म्हणून माझे विचार मांडतोय.
प्रतिष्ठेच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये राजपथचे नाव कोरलेले पाहणे हा एक ऐतिहासिक क्षण आहे. आपल्या संस्थेच्या अथक समर्पणाला ही प्रणाम, प्रत्येक व्यक्तीने त्यांचे श्रम, कौशल्य आणि उत्कट योगदान या कामासाठी दिले आहे.
आम्ही जो दृष्टीकोन ठेवून कामाला सुरुवात केली, ती केवळ रस्ते तयार करण्यापुरती नव्हती तर आपल्या प्रिय राष्ट्रामध्ये पायाभूत सुविधांच्या सुवर्णकाळ यावा यासाठी होती. चांगल्या कामातून देशाची प्रगती कशी साधली जाऊ शकते, याचा वारसा पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
श्रम हीच प्रतिष्ठा’ या भावनेची साक्ष देत आपले कार्य व नीतिमत्तेची व्याख्या करणारे हे उत्तुंग स्तंभ स्मारक डौलाने उभे आहे, ते केवळ आपल्या कर्तृत्वाचे प्रतीक म्हणून नव्हे, तर १०५ तास आणि ३३ मिनिटांच्या अखंड श्रमात वाहून गेलेला घामाचा प्रत्येक थेंब आणि सर्व कामगारांच्या अटळ वचनबद्धतेचे ते प्रतीक आहे.
Discussion about this post