व्हॉट्सअॅपच्या निळ्याशार पडद्यावर दोन अनोळखी जिंदग्यांची पहिली ओळख झाली. ‘गुड मॉर्निंग’ आणि **’गुड नाईट’**च्या सदिच्छांच्या अदृश्य धाग्यांनी त्यांच्या संवादाला सुरुवात केली. रोजच्या पोस्ट्समधूनच मग हळूच ‘तिने’ ‘त्याला’ फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोन दिवसांच्या उत्सुकतेनंतर, ती रिक्वेस्ट स्वीकारली गेली, आणि एक नवीन अध्याय उघडला. तिच्या सुंदर, विचारप्रवर्तक पोस्ट्स वाचून त्याला जाणवले, की ‘ती’ एक संवेदनशील लेखिका आहे. ‘माझ्या लेखासाठी एखादा विषय सुचवा ना,’ तिचा तो निरागस आग्रह, त्यांच्यातल्या नात्याला अधिक जवळ आणू लागला. मनातल्या कल्पनांची देवाणघेवाण सुरू असतानाच, अचानक एक दिवस तिचा फोन आला: “भेटू या!”
एका अनोळखी व्यक्तीला भेटायचे… जी केवळ डीपीवरच्या एका अस्पष्ट फोटोत पाहिली आहे. त्याच्या मनात भीतीचा एक गोळाच तयार झाला. पण तिच्या, ‘मी वेळेत पोहोचेन,’ या मॅसेजने त्याला धीर दिला. ठरलेल्या ठिकाणी, ती नेमकी वेळेवर पोहोचली. तिला असलेल्या कामासाठी अवघी पाच मिनिटे पुरेशी होती. दोघांचे दोन मिनिटांचे बोलणे झाले. “बाय, निघते!” म्हणत तिने स्कुटीला किक मारली.
ती त्यांची पहिली भेट! पण, एका विलक्षण योगायोगाने दोघांनीही एकमेकांचा चेहरा पाहिला नव्हता. कारण दोघांनीही चेहऱ्यावर स्कार्फ आणि डोक्यावर हेल्मेट परिधान केले होते.
मनाची जुळणारी स्पंदने 💕
चेहरा न पाहताही, व्हॉट्सअॅपवरील मॅसेजेसच्या माध्यमातून त्यांची ओळख अधिक घट्ट झाली. व्यक्तिगत माहितीची देवाणघेवाण झाली आणि बोलणे आता दररोजचे झाले. संभाषणाच्या या सवयीने दोघांची मने तेवढीच जवळ येऊ लागली होती. तो रात्रभर तिच्याच विचारात घालवत असे आणि सकाळ होताच ती ऑनलाइन येण्याची वाट पाहत असे. तिचा ‘गुड मॉर्निंग’चा मेसेज आल्यावरच त्याच्या दिवसाला खरी सुरुवात होत असे. ही रोजची सवय आता केवळ ‘सवय’ राहिली नव्हती, तर मनाला एक अनामिक आनंद देणारी गोडी बनली होती.
मनातल्या गूढ गोष्टी आणि हळवी गुपितं एकमेकांना सांगण्यासाठी, ‘ती’ त्याला कधी हॉटेलमध्ये तर कधी सायबर कॅफेमध्ये भेटायला बोलावत असे. ‘कॉफी टेबल सोडून सायबर कॅफेत का?’ हा प्रश्न त्यालाही पडायचा, पण ‘तिला काहीतरी नवीन शिकायचं आहे,’ या तिच्या आग्रहाखातर तोदेखील तिच्यासोबत फिरू लागला.
संवादाच्या या वाटेवर चालताना, ‘व्हॅलेंटाईन’च्या आठवड्यात, एक दिवस तिने त्याला प्रपोज केले. “तुमच्याशी बोललं की खूप बरं वाटतं,” तिचे हे शब्द मैत्रीच्या नात्याला प्रेमाचे कोंदण देऊ लागले. ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून प्रेमाच्या हळुवार गप्पा रंगू लागल्या.
चॅटिंगवर प्रत्येक गोष्ट सविस्तर सांगणे शक्य होत नव्हते, म्हणून तिने पुन्हा एकदा भेटायला बोलावले. दोघेही हॉटेलमध्ये बसले. ऑर्डर दिली. ‘आधी तू घे… नाही, आधी तू घे…’ या गोड संकोचामध्ये बराच वेळ गेला. इतक्यात वेटर भुकेची शिदोरी घेऊन आला. दोघांनीही एकाच प्लेटवर ताव मारला. एक-दोन विषयांवर चर्चा झाली. वेटर पुन्हा आला, “और क्या लाऊँ?” काही वेळाने पुन्हा… “सरजी, और कुछ?”
“नही, और कुछ नही. बिल कितना हुआ?” त्याने विचारले.
वेटरने बिल आणले. पण, त्याने काही बोलण्याआधीच ‘तिने’ बिल हातात घेतले आणि पर्समधून एक नवी कोरी पाचशेची नोट काढली. “अगं, मी देतोय बिल,” प्रियकर म्हणाला. “बिलाचं टेन्शन तू नको घेऊस,” असे सांगून तिने आपल्याकडे ‘पॉकेटमनी’ भरपूर असल्याचे संकेत दिले.
संशयाच्या सुईने विणलेली माळ 💔
पुढील अनेक दिवस आनंदात गेले. एकमेकांत रमलेल्या त्या दोघांना पुन्हा एकांतात भेटावेसे वाटू लागले. “सिनेमा बघायला जायचं का?” दोघांचाही होकार होता. पुढच्या महिन्यातील एक तारीख निश्चित झाली. त्याने दिवस मोजायला सुरुवात केली. ठरलेली तारीख अगदी दोन दिवसांवर आली असताना त्याने तिला सिनेमाची आठवण करून दिली. ‘कुठल्या सिनेमागृहात जायचं?’ पण, ती काहीच बोलली नाही. “अरे, दोन दिवस आहेत अजून, बघू की!” तिचे हे बोलणे त्याला थोडे खटकले.
अखेर तो ठरलेला दिवस उजाडला. तिच्या शेजारी बसून सिनेमा बघण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. त्याने मॅसेज केला: ‘कितीला निघायचं?’
रिप्लाय आला नाही.
त्याने फोनवर विचारले. ‘ती’ म्हणाली, “आज नको रे. बघू नंतर कधीतरी.”
त्याने अनेकदा विचारल्यानंतर, ती तारखेची भेट का टाळतेय हे गूढ त्याला उलगडले. शेवटी ती म्हणाली, “सिनेमाचं सोडून दुसरं बोल.” “पण, का?” त्याने विचारले. “तूच तर म्हणाली होतीस ना जाऊ म्हणून.”
तेव्हा तिच्या तोंडून एक वाक्य बाहेर पडले: “अरे, सिनेमागृहात माझ्या ओळखीचे लोक भेटतील.”
‘शहरात काय एकच ठिकाण आहे का, जिथे तुला सगळेच ओळखतील?’ त्याच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहिले. तिच्या ‘नको’ चे उत्तर शोधताना त्याला एक कटू सत्य समजले, की ती यापूर्वी अनेकदा सिनेमाला गेली होती. तिला आता भीती वाटत होती की, सिनेमागृहातील पडदा, भिंत आणि खुर्चीही तिला विचारतील, ‘आज सोबत आलेला कितव्या क्रमांकाचा प्रियकर आहे?’
दुहेरी विरहाचे ओझे 🍂
त्याच्या मनात तिच्याबद्दल संशयाचे भूत रंगले. तेव्हापासून दोघांचे बोलणे, भेटणेही थांबले. तिच्या जुन्या-नव्या प्रेमकथांची पाने त्याच्या नजरेसमोरून झरझर जाऊ लागली. तिच्या मोहक रूपावर कितीतरी तरुण भाळले होते; किती आले, किती गेले, तिलाही कळले नाही, कारण ‘चाहनेवालोंकी लाईन लगी थी!’
या गर्दीतही तिने एक चेहरा निवडला. मनसोक्त फिरली ती त्याच्या विचारांत. पण, नियतीने घात केला. तिच्याच मैत्रिणीच्या तो प्रेमात पडला… ही ‘डबल लव्हस्टोरी’ तिच्या मैत्रीचा धागा तोडून गेली. तेव्हापासून ती एकटीच विरहाचे ओझे घेऊन निघाली होती. अनेक हाका आल्या, पण तिच्या मनावर आधीच्या घाताचे वार अजूनही सलत होते. म्हणून ती म्हणायची, “नको आता प्रेम अन् नको आता मैत्री.”
या विरहातून ती खूप काही शिकली. मनाशीच बोलू लागली. तिच्या ओठांवर शब्द येऊ लागले, आणि त्या भावनांना तिने लेखणीतून वाट करून दिली. लिहिता लिहिता तिचे शब्द अंतर्मनातून काव्यमय होऊन बाहेर पडले. तिच्या या शब्दांना एक ‘काव्यरसिक’ मिळाला. तो देखील तिच्या भावनांना समरसून समजू लागला. तिच्याशी काव्यातूनच बोलू लागला. तिचे काही शब्द, त्याचे काही शब्द, एका माळेत गुंफले जात होते, जणू शब्द-फुलांचा स्पर्श होत होता.
एक एके दिवशी ‘मैत्री नको’ म्हणणारी ती पुन्हा प्रेम करायला लागली. अतूट, अखंड प्रेमाच्या शपथा घेतल्या गेल्या. पण, पुन्हा एकदा… सिनेमाच्या निमित्ताने, त्या पुष्पमाळेत संशयाच्या सुईने एक फूल ओवला गेला, आणि मैत्रीचा धागा तुटला.
‘आता जोडला तर गाठ पडेल.’ ही गाठ बांधावी की नाही, याच कोड्यात दोघेही आहेत. ती सध्या दुहेरी विरहात आहे.
विराम… आणि एक चिन्ह 💔
आता बरेच दिवस झाले. तिचा मेसेज नाही. ‘ती विसरली की काय,’ असे त्याला वाटू लागले. इतक्या दिवसांनी तिची आठवण झाली आणि मॅसेज करावा असे वाटले. पण, हात मोबाईलकडे जात नव्हता.
मोठी हिंमत करून त्याने ‘Hi’ टाईप केले. पण ‘सेंड’ करावे की नाही, यातच बराच वेळ गेला. ‘बघू पुढे होते ते,’ या विचाराने त्याने हिंमत केली आणि सेंडवर क्लिक केले. मेसेज ‘सेंट’, ‘डिलिव्हर्ड’ आणि लगेच ‘सीन’ झालेला दिसला. ती ऑनलाईन होती! बहुतेक ती त्याच्याच मॅसेजची वाट बघत असावी, असे त्याला क्षणभर वाटले. समोरून रिप्लाय येत असल्याचे ‘टायपिंग’ वरून लक्षात आले. काय रिप्लाय देईल, याची उत्सुकता मनात होती.
रिप्लाय आला… त्याने बघितले, तर केवळ ‘👀’ असे चिन्ह होते.
पुढे तिने काहीच लिहिले नव्हते. तिच्या भावना आता मुक्या झाल्या होत्या. काही वेळाने एक मॅसेज आला, “मला कृपया मॅसेज करू नका.”
त्याला धक्काच बसला. पुढे रिप्लाय देण्याचा प्रश्नच नव्हता. प्यार वाली लव्हस्टोरी इथेच थांबली.
– देवनाथ गंडाटे















Discussion about this post