आजच्या डिजिटल युगात, मजकूर आणि शब्दांपेक्षा इमोजीद्वारे संवाद साधणं अधिक लोकप्रिय होत आहे. हे लहान, रंगीबेरंगी चित्रं आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचा एक मजेदार आणि गतिमान मार्ग बनले आहेत. सध्याच्या आधुनिक युगात सोशल मीडियाद्वारे आपण एकमेकांशी जोडले गेलो. सोशल मीडिया एकमेकांसोबत संवाद साधताना आपण इमोजीचा वापर करतो. चॅट, पोस्ट किंवा कमेंट करताना इमोजीचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे इमोजी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. इमोजीमुळे आपण आपल्या मनातील भावना किंवा चेहऱ्यावरील हावभाव समोरच्यापर्यंत उत्तमरित्या पोहोचवू शकतो.
इमोजीचा शोध जपानमध्ये लागल्याचं सांगितलं जातं. शिगेताका कुरिता यांनी 1998 इमोजीचा शोध लावला. जगातील पहिला इमोजी त्यांनी एका टेलिकॉम कंपनीसाठी तयार केला होता. 90 च्या दशकाच्या शेवटी इमोजीचा शोध लागला. शिगेताका कुरिता एका एनटीटी डोकोमो या टेलिकॉम कंपनीसाठी काम करत होते. मेसेजमध्ये आपली भावना अधिक चांगल्याप्रकारे मांडण्यासाठी त्यांनी फोटो ऐवजी कॅरेक्टर वापरण्याची संकल्पना मांडली, यातूनच इमोजीचा जन्म झाला.
पूर्वी ईमेल पाठवण्यासाठी अक्षरांची संख्या फक्त 250 होती. लोकांना त्यांच्या भावना इतक्या कमी शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता येत नव्हत्या. ही अडचण दूर करण्यासाठी कुरिता यांनी पहिल्यांदा इमोजी बनवण्यास सुरुवात केली. 1998 च्या शेवटी आणि 1999 च्या सुरुवातीला इमोजीचा वापर सुरु झाला. त्यानंतर हळूहळू 2010 नंतर इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. 1999 मध्ये शिगेताका कुरिता यांनी इमोजीचा पहिला सेट जारी केल्या. या इमोजी सेटमध्ये स्माईली, राग अशा वेगवेगळ्या भावनांचे इमोजी होते.2014 पासून 17 जुलै रोजी जगभरात ‘इमोजी डे’ साजरा केला जातो. इमोजीपीडिया ही एक युनिकोड मानक ऑनलाइन वेबसाइट आहे. ही वेबसाईट इमोजी आणि त्यांच्या डिझाइनची नोंदणी करते. इमोजीपीडियाचे संस्थापक जेरेमी बर्गे यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा ‘इमोजी डे’ साजरा करण्यास सुरुवात केली होती. 2010 मध्ये इमोजींचा वापर वाढला आणि ‘वर्ल्ड इमोजी डे’ जगभरात साजरा होण्यास सुरुवात झाली.
आज बहुतेकजण आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी इमोजी पाठवितात. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हाट्सएपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इमोजीचा सर्वाधिक वापर केला जातो. एसएमएस, एमएमएस सारख्या मेसेजिंग ऍप्लिकेशन्स मध्येही इमोजी लोकप्रिय आहेत. काही वेबसाइट्स आणि ब्लॉग इमोजीचा वापर त्यांच्या ब्लॉगपोस्टला अधिक आकर्षक बनवण्यासाठी करतात. एकूणच इमोजी भावना, कल्पना आणि संदेश व्यक्त करण्यासाठी वापरले जातात. ते मजकूराचा अर्थ स्पष्ट करण्यास, विनोद व्यक्त करण्यास आणि संवाद अधिक मनोरंजक बनवण्यास मदत करतात. पण, इमोजीचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. योग्य इमोजी निवडणं महत्वाचं आहे. चुकीचा इमोजी निवडल्यास चुकीचा संदेश पोहोचू शकतो. काही इमोजींचे अनेक अर्थ असू शकतात. त्यामुळे पुढील व्यक्तीला गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. खूप जास्त इमोजी वापरल्याने अर्थबदल होऊन संदेश गोंधळात टाकू शकतो. इमोजी हे डिजिटल संवादाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. ते आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करण्याचा एक मजेदार आणि गतिमान मार्ग प्रदान करतात. योग्यरित्या वापरल्यास, ते संवाद अधिक प्रभावी आणि आनंददायी बनवू शकतात.पण, ते वापरतानाही काळजी घेणे गरजेचे आहे.
Discussion about this post