संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.९.
सध्या तालुक्यात तेंदुपत्ता संकलनाचे हंगाम सुरू आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका महिलेवर वाघाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज ता.९ मे शनिवारला सकाळी ६.०० वाजता दरम्यान घडली.
या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले आहे.या हल्ल्याने बोंडगाव सुरबन परिसरात परिसरात दहशतिचे वातावरण पसरले आहे. वाढत्या वाघाच्या वावरामुळे जंगल परिसरातील गावांमध्ये नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गोठणगाव वनपरिक्षेत्राचे वनपरीक्षेत्रधिकारी मिलिंद पवार यांनी नागरिकांनी सर्तकता बाळगण्याचे आवाहन सूचना व आदेश काढून केले आहे.
प्राप्त माहितीनुसार,तालुक्यातील बोंडगाव सुरबन येथील रहिवासी सुनिता चंद्रकुमार हटवार (वय ४७) या शनिवारी सकाळच्या सुमारास इतर महिलांसह नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता संकलनासाठी जवळील जंगल परिसरात गेल्या होत्या. सध्या तेंदूपत्ता हंगाम सुरू असल्याने पहाटेपासूनच मोठ्या संख्येने महिला व नागरिक जंगलात जात आहेत. याच दरम्यान झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक सुनिता हटवार यांच्यावर झडप घालत हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. सुनिता हटवार यांनी आरडाओरड केल्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या महिलांनी धाडस दाखवत घटनास्थळी धाव घेतली. महिलांचा गोंधळ आणि आरडाओरड ऐकून वाघाने जंगलाच्या दिशेने पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या हल्ल्यात सुनिता हटवार यांच्या हात, पाठ आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ जंगलातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर बोंडगाव/सुर तसेच आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मागील काही दिवसांपासून या भागात वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या महिलांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करण्यात आली. नागरिकांनी जंगलात एकट्याने न जाण्याचे तसेच समूहानेच जंगलात प्रवेश करण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. तसेच वाघाचा माग काढण्यासाठी गस्त वाढविण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, जखमी महिलेला वनविभागाकडून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, जंगल परिसरात सतत गस्त ठेवावी आणि तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात,अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
वनविभागाचे आवाहन.
गावांमध्ये ग्रामपंचायतने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना सतर्क करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जंगलात जात आहेत. आज बोंडगाव सुरबान येथील एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर गोठणगाव वनपरिक्षेत्राने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
वन विभागाने जंगलात एकट्याने न जाण्याचे सांगितले असून किमान ५ ते १० जणांच्या समूहानेच प्रवेश करावा, तसेच सतत आवाज करत राहावे, जेणेकरून वन्यप्राण्यांशी अचानक संपर्क टाळता येईल. सकाळी लवकर व सायंकाळी जंगलात जाणे टाळावे. वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ वन कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार यांनी केले आहे.












Discussion about this post