मोटारसायकलला पाठीमागून ॲम्बुलन्सची जोरदार धडक | २५ वर्षीय युवक ठार,एक जखमी | वेग आणि निष्काळजीपणामुळे अपघात.
संजीव बडोले प्रतिनिधी/ नवेगावबांध दि.१. येथील गावाबाहेरील कोहमारा अर्जुनीमोरगाव राज्य महामार्गावर देवलगाव शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मोटरसायकलला पाठीमागून सुसाट वेगात येत असलेल्या ॲम्बुलन्सने जोरदार धडक दिल्याने
झालेल्या भीषण अपघातात येथील २५ वर्षीय युवक जागीच ठार झाला.तर एक जखमी झाला. काल दि.३१ ऑगस्ट रविवारला सायंकाळी ७.३० च्या सुमारास हा दुर्दैवी भीषण अपघाता झाला.
मृतक नवेगावबांध येथील प्रभाग क्रमांक एक मधील रहिवासी असून तारेश मनोहर सांगोळकर (वय २५ वर्षे) असे नाव आहे.त्यांच्या मागे एक लहान भाऊ,आई-वडील व बराच मोठा आप्त परिवार असून, दुःखात बुडाले आहे.
या भीषण अपघातामुळे सांगोळकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून,तारेशच्या दुर्दैवी अपघाती निधनाबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.ही धडक ॲम्बुलन्सने पाठीमागून दिल्यामुळे घटना अधिक धक्कादायक ठरली आहे.हे विशेष.
सदर ॲम्बुलन्स ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथील शासकीय वाहन असल्याचे समजते.ॲम्बुलन्सचा भरधाव वेग आणि वाहन चालकाचा निष्काळजीपणामुळे हा भिषण अपघात झाल्याची सर्वत्र चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार,तारेश हा आपल्या मित्रांबरोबर काल रविवार (दि.३१ ऑगस्ट) ला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गणेश उत्सवानिमित्त आयोजित बोळदे कवठा येथे एका मित्राकडे त्याचे मित्र अनिल पुरुषोत्तम मेश्राम राहणार चांना कोडका हल्ली मुक्काम नवेगावबांध,वैभव कन्हैयालाल राऊत, सुधीर राऊत दोघे येथील रहिवासी जेवण करण्यासाठी जात होता.
मित्र अनिल मेश्राम याच्या मोटरसायकलवर मृतक तानेश बसला होता.
देवलगाव जवळ ते रस्त्याच्या कडेला मोटर सायकल उभी करून थांबले होते.
एवढ्यात पाठीमागून आलेल्या व अर्जुनी मोरगावच्या दिशेने जाणाऱ्या सुसाट वेगात असलेले ॲम्बुलन्सने मोटर सायकलला जबर धडक दिली.धडक एवढी जबर होती की १०० मीटर मोटरसायकल फरफटत गेल्याचे प्रत्येक दर्शनी सांगितले.यातच तारेश मनोहर सांगोळकर (वय २५ वर्षे) हा जागीच ठार झाला.प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली खरे, मात्र तोवर युवक जागीच ठार झाला होता.
तर मोटारसायकल चालक अनिल मेश्राम रस्त्याच्या बाजूला फेकला गेला.त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे भरती करण्यात आले होते.आज सोमवारला अनिलला वैद्यकीय उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
तानेशह हा आपल्या मित्रांबरोबर येथील खुणे वाचनालयात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग चालवीत होता.हे येथे उल्लेखनीय आहे.त्याच्या दुर्दैवी निधनाबद्दल सारं गाव हळहळत आहे.तर सांगोळकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मृतक तारेशचे शवविच्छेदनानंतर प्रेत आज नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सोमवारला दुपारी १.०० वाजता त्याच्यावर स्थानिक स्मशान घाटावर शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आला. पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून,पुढील तपास सुरू आहे.













Discussion about this post