नागपूर: शनिवार, 14 डिसेंबर 2024 रोजी नागपूर स्कूल ऑफ आर्ट येथे आयोजित ‘आर्ट कट्टा’ या कलाक्षेत्राशी संबंधित विशेष कार्यक्रमामध्ये विविध प्रसिद्ध व तज्ञ कलावंतांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसिद्ध निसर्ग चित्रकार श्री हेमंत मोहोड आणि प्रसिद्ध चित्रकार श्री अब्दुल गफ्फार यांचे प्रात्यक्षिक होते.
प्रथम सत्रात श्री हेमंत मोहोड यांनी जलरंगाच्या माध्यमातून निसर्ग चित्रे कशी रेखाटायची यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्याकडून निसर्ग चित्रकलेच्या वास्तववादी रेखाटनाचे महत्त्व तसेच जलरंग हाताळण्याचे तंत्र प्रात्यक्षिकाद्वारे शिकवले गेले. कला विद्यार्थ्यांसह कलारसिकांसाठी हा सत्र अत्यंत उपयुक्त ठरला.
द्वितीय सत्रात श्री अब्दुल गफ्फार यांनी निसर्गातून प्रेरणा घेऊन चित्रनिर्मितीवर आधारित प्रात्यक्षिक सादर केले. त्यांच्याकडून चित्रकलेतील सृजनात्मकतेवर भर देण्यात आला, ज्यामुळे उपस्थित कलाकारांना नवीन दृष्टिकोन मिळाला.
या कार्यक्रमास अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या, त्यात जेष्ठ चित्रकार आणि बसोली संस्थापक श्री चंद्रकांत चन्ने, आईडीयल फाईन आर्ट अँड कल्चरल सोसायटीचे अध्यक्ष प्रा. अमोल पाटील, संचालक श्री भूपेंद्र कवडते आणि प्राचार्य श्री प्रथमेश देशपांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाला शेकडो कला विद्यार्थी आणि कलेचे प्रेमी उपस्थित होते. याशिवाय, वरिष्ठ चित्रकार श्री नाना मिसाळ, क्युरेटर श्री अमित गोनाडे, माजी अधिव्याख्याता स्वप्ना हरदास, प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर सुरेंद्र नितनवरे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रायोजन बी. डब्ल्यू. एम. इंफ्राकॉम प्रायवेट लिमिटेड यांच्या संचालक श्री अभय वखरे आणि आर्किटेक्ट श्री राजेश बावने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागपूर स्कूल ऑफ आर्टचे प्रा. हरीश भिसिकर, प्रा. अक्षय चवडे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी गार्गी आमटे, श्रावणी शेराम, पूजा भोयर आणि इतर विद्यार्थ्यांचे योगदान उल्लेखनीय होते.
या प्रात्यक्षिक शृंखलेत शरद पवार चित्रकला महाविद्यालय, शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूर, एम. जे. चित्रकला महाविद्यालय, श्री चित्रकला महाविद्यालय आणि नटराज चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Discussion about this post