इन्स्टाग्रामवर कॉमेडी रिल्स करून लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनललेल्या सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनची ट्रॉफी जिंकली. बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना ‘गुलीगत’ धोका देऊन सूरजने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. अभिजीत सावंतचा पराभव करून सूरजने लाखो चाहत्यांची मनं जिंकली. कोण आहे सूरज चव्हाण? कसा ठरला Bigg Boss हे जाणून घेउया.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोडवे गावात सूरज चव्हाणचा १९९२ मध्ये जन्म झाला. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यामुळे त्याचे बालपण इतर सर्वसामान्य मुलांसारखे नव्हते. सूरज लहान असतानाच त्याचे वडिलाचे कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर आजारपणामुळे आईचे देखील निधन झाले. सूरजला 5 मोठ्या बहिणी आहेत. त्यांनीच सूरजचा सांभाळ केला. आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे सूरजला मजुरी करावी लागली. त्याला 300 रुपये दिवसाला मिळत होते. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्याचे आठवीपर्यंत शिक्षण झाले असले तरी त्याला मराठी वाचता येत नाही.
सूरज चव्हाण सोशल मीडियावरचा लोकप्रिय स्टार आहे. सूरज इन्स्टाग्रामवर कॉमेडी कंटेन्ट शेअर करून चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. तसच सूरज कॉमेडी करतानाच भन्नाट अभिनय करून व्हिडीओही शेअर करत असतो. सूरजला त्याच्या बहिणीच्या मुलाकडून टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफार्मची माहिती मिळाली. त्याने इतर कोणाच्या मोबाईलवरून एक व्हिडिओ बनवला. पहिलाच व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. मग त्याने मजुरीतून मिळालेल्या पैशातून मोबाईल घेतला. अन् त्याच्या हटके स्टाईलमुळे सोशल मीडियावर तो प्रचंड लोकप्रिय झाला. त्याचे टिकटॉकवर लाखो फॉलोवर्स आहेत.
पण संघर्ष त्याच्या जीवनात अजूनही होता. भारतात टिकटॉकवर बंदी आली. मग सूरजने हार मानली नाही. त्याने इंस्टाग्राम व यूट्यूबवर व्हिडिओ सुरु केले. त्या ठिकाणी प्रचंड यश मिळाले. त्याचे संवाद लहान लहान मुलांच्या तोंडात सहज ऐकायला मिळू लागले
पैसे कमावण्यासाठी सुरजने वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही केलं. त्याचा इथवरच प्रवास मुळीच सोपा नव्हता. शिकलेला नसल्याने त्याला बिग बॉसच्या घरात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे सुरजने या कार्यक्रमात येण्यास नकार दिला होता. बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची त्याच्या गावी जाऊन समजूत काढली होती. त्याच्या साधेपणाने त्याने सगळ्यांची मनं जिंकली. आपल्या वागण्यामुळे, प्रत्येकाचा आदर करण्याच्या सवयीमुळे, टास्कमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे सूरजला सगळ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. अखेर सगळ्या अडचणींचा सामना करत सूरज आता बारामतीचा किंग ठरला आहे.
कधीकाळी 300 रुपये मुजरीवर जाणारा सूरज रिलस्टार झाला आहे. आता इंस्टाग्राम प्रोमोशन आणि यूट्यूब हे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. तो अनेक ठिकाणी कार्यक्रमांच्या उदघाटन समारंभसाठी जात असतो. त्यासाठी तो 40-50 हजार रुपये मानधन घेतो. त्याला आता चित्रपटही मिळू लागले आहे. आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपये सूरज कमवत आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये तो दिसला. सुरुवातीपासूनच सूरज चव्हाणची सर्वत्र चर्चा होताना दिसली होती. त्याने घरातील इतर स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण, सूरज जेव्हा ‘बिग बॉस मराठी’ शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला, तेव्हा त्याच्याकडे फक्त दोन टी-शर्ट आणि तुटलेली चप्पल होती. या शोच्या सेटवर आल्यानंतर त्याला कपडे दिले गेले. या परिस्थितीतून वर आलेल्या सूरजने अल्पावधीतच आपल्या साधेपणाने आणि वागणुकीने सगळ्यांची मने जिंकली. बिग बॉस मराठी पाचच्या सीजनमध्ये सूरजला प्रत्येक आठवड्याला 25 हजार रुपयांचं मानधन मिळालं.
अभिनेता रितेश देशमुख बिग बॉस मराठी सीजन पाचचा होस्ट होता. बिग बॉस सीजन पाचचा विजेता ठरल्यानंतर सूरजला 14.60 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेल्या सूरजवर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला बक्षीस स्वरूपात 14 लाख रूपयांचा चेक देण्यात आला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सरर पु.ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रूपये जाहीर करण्यात आले आहे. तसेच त्याला एक इलेक्ट्रीक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.
Discussion about this post